News Flash

कोल्हापूरमधील रिक्षाचालकाच्या मुलीला वयाच्या २१ व्या वर्षीच अमेरिकन कंपनीकडून ४१ लाखांचे पॅकेज

पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.

Amruta Karande
कॉलेजने तिचा सत्कारही केलाय. (फोटो लिंक्डइन आणि गुगल मॅपवरुन साभार)

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये बेरोजगारी आणि पगारकपातीसंदर्भातील बातम्या समोर येत असतानाच कोल्हापूरमधील अमृता कारंडे या तरुणीला ४१ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. २१ वर्षीय अमृता ही अजूनही कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच केआयटीमध्ये सॉफ्टेवेअर इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. अमृताला अमेरिकेतील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अॅडॉब या कंपनीने प्री प्लेसमेंट ऑफर लेटर दिलं आहे. अमृता ही कंपनीच्या नोएडा येथील कार्यालयामध्ये रुजू होणार आहे.

अमृता ही मध्यमवर्गीय मराठी घरातील मुलगी असून तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक आहे तर आई गृहिणी आहे. “मला शिक्षण घेता यावं म्हणून माझ्या पालकांनी फार कष्ट घेतले आहेत. मला त्यांच्या या कष्टानंतर त्यांना थोडा आनंद देता आला याचं समाधान आहे. मला भारतामधील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे,” असं अमृताने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

केआयटीचे अध्यत्र सुनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृताने अॅडॉबने आयोजित केलेल्या सी कोडींगच्या स्पर्धेमध्ये पाहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर अमृताला कंपनीकडून अडीच महिन्यांच्या इंटर्नशीपची संधी देण्यात आली. यासाठी तिला कंपनीने स्कॉलरशीप स्वरुपात महिन्याला एक लाख रुपये दिले. या कालावधीमध्ये तिच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या ज्यात तिने अगदी उत्तम कामगिरी केल्याचं कुलकर्णी सांगतात. त्यानंतर तिला कंपनीने थेट ४१ लाखांची नोकरीची ऑफर दिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचं कुलकर्णी म्हणाले.

अमृता ही अभ्यासामध्ये लहानपणापासूनच हुशार होती असं तिचे वडील विजयकुमार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. “दहावीमध्ये तिला ९७ टक्के होते. त्यानंतर तिने विज्ञान शाखेमधून आपलं १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तिला डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र त्यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमध्ये रस दाखवत केआयटीमध्ये प्रवेश मिळवला. तिचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच तिला मिळालेल्या या ऑफरमुळे आम्ही फार समाधानी आहोत. कॉलेजनेही तिला या सर्वात मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार आहोत,” अशी प्रतिक्रिया अमृताच्या वडिलांनी नोंदवलीय. नुकताच कॉलेजनेही अमृताचा विशेष सत्कार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2021 8:56 am

Web Title: kolhapur auto driver daughter amruta karande bags adobe 41 lakh annual pay offer scsg 91
Next Stories
1 महापुरामुळे ऊस शेतीला फटका; एक लाख हेक्टर उसाचे नुकसान
2 कोल्हापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
3 दुसऱ्यांवर चिखलफेक करणे हा बेजबाबदारपणा
Just Now!
X