करोना विषाणूंच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेत, कोल्हापुरात काल(सोमवार) रमजान ईद साजरी केली गेली. या निमित्त कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल समितीने जिल्ह्यातील दोन मोठ्या रुग्णालयांना रुग्णसेवेसाठी लागणारे ६० लाख रुपयांचे अत्यावश्यक साहित्य देऊन,  सामाजिक बांधिलकीचे व एकात्मतेचे दर्शन घडवले.

यंदा रमजान सणावर करोना विषाणूचे सावट होते. यामुळे ना मशिदीत सामूहिक प्रार्थना झाल्या, ना पटांगणावर सामूहिक नमाज पठण करण्यात आली. अनेकांनी नवीन कपडे, मौजमजा या प्रकारांना यंदा फाटा दिला. या ऐवजी श्रीमंतांनी गरिबाघरची ईद गोड होण्यासाठी मदत केली.  कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल समितीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवित करोना संकट निवारणासाठी मदतीचा हात पुढे केला.

मुस्लिम धर्मीय सामाजिक, धार्मिक कार्यासाठी काही निधी राखीव ठेवत असतात. तो बैतूलमाल समितीकडे प्रदान केला जातो. त्यातून गरीब, गरजू लोकांना मदत केली जाते. यंदा करोनाचे संकट महत्त्वाचे असल्याने हा निधी करोना निवारणासाठी वापरात आणण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल समितीने घेतला. मौलाना जाफर सय्यद यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक तौफिक मुल्लाणी, झाकीर कुरणे, अदिल फरास, नवेझ मुल्ला आदींनी यामध्ये सहकार्य केले.

कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व इचलकरंजी येथील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय (आयजीएम) या दोन रुग्णालयांना प्रत्येकी ३० लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य देण्यात आले. करोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी या ठिकाणी  अत्यावश्यक साहित्याची काही प्रमाणात उणीव जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार बैतूलमाल अंतर्गत निधी संकलन करून त्यातून ६० लाख रुपयांचे साहित्य दोन्ही रुग्णालयांना देण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेला हा उपक्रम एकात्मतेच्या भावनेने रमजान ईदचे पर्व अनोख्या पद्धतीने साजरा करणारा ठरला.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक –

मुस्लीम समाजाचे योगदान कौतुकास्पद ठरले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘करोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून करोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.