विविध संमारंभामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय ज्यांचे राजकारण पुढे जात नाही, अशा हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र करोना समस्यांनी ग्रस्त असल्याचे ओळखून राजकीय टीका टिप्पणी बंद करावी.  आपले अपयश लपवण्यासाठी राजकारणाच्या खालच्या पातळीवर जाऊ नये, असा टोला शुक्रवारी कोल्हापूर भाजपाच्यावतीने लगवण्यात आला आहे.

‘माणसं जगलीत की मेली ते तरी बघायला या’; अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर काल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. या टीकेचा समाचार घेत आज कोल्हापूरच्या भाजपाच्यावतीने तातडीची बैठक घेऊन त्यांना प्रतित्युत्तर  देण्यात आले. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई आदींसह यावेळी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा- “माणसं जगलीत की मेली ते तरी बघायला या”; चंद्रकांत पाटीलांना ग्रामविकास मंत्र्यांचा टोला

मुश्रीफ यांची कार्यपद्धती एका घराण्यापुरती मर्यादित व विचारसरणी संकुचीत आहे. चंद्रकांत पाटील  प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रात सतत प्रवास करत असतात. याउलट आपण नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या जिल्ह्यास किती न्याय दिला? असा सवाल करून पालकमंत्री म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात याचे मार्गदर्शन त्यांनी चंद्रकांतदादांकडून घ्यावे, असा टोला या वेळी मुश्रीफ यांना लगावण्यात आला.

कोल्हापूरवर आपत्ती कोसळली त्या वेळेस चंद्रकांतदादा पहाडासारखे सामोरे गेलेले आहेत, हे कोल्हापूरची जनता अत्यंत चांगल्या पद्धतीने जाणते. अशाप्रसंगी त्यांनी प्रसिद्धीचा हव्यास केला नाही, असे सांगत. सरकार तुमचे, तुम्ही मंत्री सर्व यंत्रणा तुमच्या आधीन असे असताना लोकांना मदत करायची सोडून, सातत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करून पक्षाच्या प्रमुखांची वाहवा मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीकाही यावेळी  भाजपाकडून केली गेली.