आयारामांना पदे आणि सन्मान देण्याच्या धोरणातून कोल्हापूर भाजपामधील खदखद पुढे येत आहे. यातूनच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

“सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षात फोडाफोडी करून अनेकांना भाजपात घेतले. पण जुन्या जाणत्यांना डावलून नव्याने व इतर पक्षांतुन आलेल्यांनाच अनेक पदे दिली. दोघांनीही या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. एकतर्फी विजय मिळेल असा त्यांना विश्वास होता. बाहेरून आलेल्या लोकांवर विश्वास ठेवला. पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याने भाजपचा पराभव झाला.त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेऊन पाटील व घाटगे यांनी राजीनामा द्यावा,” असा घरचा आहेरच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. “आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही. पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्ष सक्षम असला पाहिजे ही भूमिका बऱ्याच कार्यकर्त्यांची आहे,” असेही शिवाजी बुवा आणि पीड पाटील म्हणाले.