कोल्हापूर शहरातील करोना निर्बंधात शिथिलता मिळाली असून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी सकाळी पहिल्याच दिवशी दुकाने उघडताच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात रस्तोरस्ती गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. इचलकरंजीसह अन्य शहरांमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी दिली नसल्याने व्यापारी वर्गांमध्ये वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत चालली होती. कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद होती. तीन महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापारी आक्रमक झाले होते. त्यांनी दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी यासाठी गेले महिनाभर आंदोलन छेडले होते.

हेही वाचा – साताऱ्यात प्रशासनाने लावलेली टाळेबंदी अन्यायकारक, निर्बंध ताबडतोब शिथिल करा – शिवेंद्रसिंहराजे भोसले

रविवारी झालेल्या बैठकीत आपण काहीही झालं तरी दुकानं उघडणारच असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. त्यावर शासकीय पातळीवर सूत्रे हालली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शासनाने सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात कोल्हापूर शहरातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत सुरू करण्यास परवानगी दिल्याचे घोषित केले. शासनाच्या या निर्णयाचे व्यापारी वर्गाने स्वागत केले.

शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची लगबग सुरू केली. दुकाने उघडताच ग्राहकांनीही खरेदीसाठी गर्दी केली. पुन्हा एकदा आर्थिक उलाढाल सुरू झाली असल्याने व्यापारी वर्गात अनेक दिवसानंतर समाधानाचं वातावरण होतं.

दुकाने उघडण्यासाठी केवळ कोल्हापूर शहराला परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यातील अन्य शहरांना, गावांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे तेथील व्यापारी वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. इचलकरंजी इथल्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करणार असा निर्धार केला आहे. त्यांनी आज सकाळी एकत्र येऊन व्यवहार सुरू ठेवायचे अशी भूमिका घेतली आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांच्या समवेत सकाळी नगरपालिकेमध्ये चर्चा होणार आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची भूमिका घेतली असताना पोलिसांनी मात्र कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.