News Flash

कोल्हापूर डीसीसी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, पेन्शनमध्ये चौपट वाढ

तोकड्या निवृत्ती वेतनावर गुजराण करणाऱ्या दीड हजारांवर कर्मचाऱ्यांची विवंचना आता कायमची संपुष्ठात येणार आहे. निवृत्ती वेतन चौपटीहून अधिक मिळणार आहे.

दरमहा दोन ते अडीच हजारांची निवृत्ती वेतनाची रक्कम यापुढे पाच आकड्याचा उंबरठा ओलांडणार आहे. हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांना 'संध्याछाया सुखविती' असा म्हणायला लावणारा ठरला आहे.

आयुष्यातील महत्वाची वर्षे संस्थेची सेवा करण्यात घालवायची आणि आयुष्याच्या संध्याकाळी तोकड्या निवृत्ती वेतनावर गुजराण करायची, ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवा केलेल्या दीड हजारांवर कर्मचाऱ्यांची विवंचना आता कायमची संपुष्ठात येणार आहे. याला कारण ठरले आहे ते बँक व्यवस्थापनाने गुरुवारी घेतलेला निवृत्ती वेतनात तब्बल चौपट वाढ करण्याचा निर्णय. राज्यात अशाप्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती ही पहिली मध्यवर्ती सहकारी बँक बनली आहे.

दरमहा दोन ते अडीच हजारांची निवृत्ती वेतनाची रक्कम यापुढे पाच आकड्याचा उंबरठा ओलांडणार आहे. हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांना ‘संध्याछाया सुखविती’ असा म्हणायला लावणारा ठरला आहे. या निर्णयाचा लाभ पुढील काळात सेवारत पाच हजारांवर कर्मचाऱ्यांनाही होणार असल्याने सध्या या बँकेत ‘अच्छे दिन’ आल्याचा आनंद कर्मचारी वृन्दामध्ये दिसत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतीशी संबंधित व्यवहार करणाऱ्या बँका म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे पाहिले जाते. आता काही प्रमाणात या बँका व्यावसायिक प्रकारच्या सेवा देण्यास सज्ज होताना दिसत आहेत. यामुळे अनेक मध्यवर्ती बँकांतील कर्मचाऱ्यांना वेतन मर्यादित होते. वेतनाचे आकारमान मर्यादित असल्याने निवृत्ती वेतन तरी किती असणार? ते ही तसे तोकडेच. दरमहा दोन ते अडीच हजारांच्या निवृत्ती वेतनात महिना काढणे निवृत्त कर्मचाऱ्यांना जिकिरीचे बनलेले असते.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आणि …

हाच मुद्दा एकदा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला असता न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी सुधारित नियमाप्रमाणे निवृत्ती वेतन देण्यास सांगून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या व्यवस्थापनाचे कान टोचले होते. न्यायालयाने बजावून सुद्धा आजही अनेक बँकाकडून या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा कटू अनुभव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना येत आहे. आत्तापर्यंत देशात हरियाणा व केरळ या दोनच राज्यांनी ही सुधारित निवृत्ती वेतनाची योजना लागू केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यावतीने डी.एम.पाटील, बी. आर. यादव यांनी हा निर्णय बँकेत लागू करावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे .

राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवृत्ती वेतन

आमच्या बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे दरमहा दोन ते अडीच हजारांचे निवृत्ती वेतन यापुढे चौपटीहून अधिक मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवृत्त होताना असलेल्या पगाराच्या निम्म्या रकमेइतके निवृत्ती वेतन मिळावे यासाठीही प्रयत्न करणार आहे, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. सुधारित नियमानुसार सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित फरकाची रक्कम एकाच वेळी अदा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 6:48 am

Web Title: kolhapur dcc bank decide to give four times pension to retired staff
टॅग : Kolhapur
Next Stories
1 Vidhan Parishad Election: नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या दराडेंचा दणदणीत विजय
2 Vidhan Parishad Election: कोकणात भाजपाचे ‘डाव’खरे, चुरशीच्या लढतीत शिवसेनेचा पराभव
3 छगन भुजबळ हेच घोटाळ्याचे सूत्रधार!
Just Now!
X