घातक कीटक नाशके – तन नाशके, रासायनिक खत यांच्या बेसुमार वापरामुळे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील कृष्णा – पंचगंगा नदीकाठचा भाजीपाला आरोग्याला धोकादायक बनत चालला आहे. या भागात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याला सकारात्मक बदलाचे वळण देण्यासाठी तालुक्यात दर गुरुवारी सेंद्रीय भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला.

शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्यामधील दत्त ग्राहक भांडार सभागृहात सेंद्रीय भाजीपाला व फळे उत्पादक शेतक-यांची याबाबत बैठक आयोजित केली होती. शेती विषमुक्त करण्याबरोबरच ग्राहकांना आरोग्यदायी सेंद्रीय भाजीपाला मिळण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्व समजून घेतले पाहिजे, असा उल्लेख करून कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील यांनी, सेंद्रीय भाजीपाल्याला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी सामुदायीक प्रयत्न करतानाच सर्वजण एकत्र येऊन सेंद्रीय भाजीपाला उत्पादकांची संस्था स्थापन करुया,असे यावेळी आवाहन केले.

निर्यात परवान्यासाठी प्रयत्न –

सेंद्रीय शेतीचा प्रसारासाठी चार वर्षाच्या प्रयत्नांची माहिती देऊन पाटील म्हणाले की, पूर्णत: सेंद्रीय पध्दतीने उत्पादित भाजीपाल्याला मुंबई, पुणे महानगरासह विदेशात निर्यात करता येणे शक्य असल्याने निर्यात परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी शितल हावळे, प्रविण शंकर माळी, दिपक जाधव आदी सेंद्रीय भाजीपाला उत्पादक शेतक-यांनी अडचणी व अनुभव सांगितले. शेतीतज्ञ वसंतराव हंकारे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, माती परिक्षणचे ए.एस.पाटील, मुसा डांगे उपस्थित होते.