News Flash

कोल्हापूर : “करोना रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर भर द्या”; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली करोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक

कोल्हापूर मधील सीपीआर व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे देखील राजेश टोपेंनी सांगितले आहे.

“करोना रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर अधिक भर देऊन बाधित रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत.” असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापूर येथे आरोग्य यंत्रणेस दिले. तसेच, “ताप, सर्दी, खोकला यासह अन्य काही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ तपासणी करुन घ्यावी.” असे आवहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत होते.

…तर निर्बंध अजून कठोर करणार; अजित पवारांचा कोल्हापूरकरांना इशारा

तर, कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

या बैठकीस ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अखिल महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील तसेच खासदार, आमदार, पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “प्रथमदर्शनी कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, गगनबावडा, शिरोळ तालुक्यामध्ये करोनाचा रुग्णदर अधिक असल्याचे दिसत आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी या तालुक्यात मृत्यूदर अधिक आहे. जिल्ह्यातील करोना रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर अधिक भर देऊन बाधित रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत. लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ही चांगली बाब आहे. महाआयुष ॲप, संजिवनी अभियान जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सहव्याधीग्रस्त रुग्णांवर अधिक लक्ष द्या. कोविड पश्चात आजार उद्भवू नयेत, याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे. तसेच, संपर्कातील रुग्णांचा शोध घ्या. मृत्यूदराचे ऑडीट करुन घेऊन त्रूटी दूर करा. आरोग्य विषयक प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोल्हापूर मधील सीपीआर व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे”, असे निर्देशही यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असणाऱ्या उपाययोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोविडच्या अनुषंगाने मतदारसंघात आरोग्य विषयक सोयी सुविधांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या बाबींचा ऊहापोह करुन आभार व्यक्त केले.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे- 

१.करोना नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याला आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार
२.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नमुना तपासण्यांची संख्या वाढवा, बाधित दर अधिक असणाऱ्या गावांमधील सर्व नागरिकांच्या तपासण्या करुन घ्या
३.बाधित रुग्णांकडून संसर्ग फैलावू नये, यासाठी संस्थात्मक अलगीकरण प्रभावीपणे करुन सुविधा उपलब्ध करुन द्या
४.सीपीआर, इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देणार
५.साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि कोविड केअर सेंटर गतीने मार्गी लावावेत
६.परराज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची सक्तीने तपासणी करा
७.१८ वर्षापुढील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा,
८.रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल, ऑक्सिजन ऑडिट करुन घेऊन त्रूटी दूर करा
९.रुग्णालयांच्या बिलाचे ऑडिट करुन अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करावी.
१०.तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांसाठी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्या
११.ग्रामविकास, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदभरती गतीने भरण्यासाठी परवानगी
१२.डोंगराळ भागासाठी रुग्णवाहिका देण्यात येईल
१३.म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार
१४.आरोग्य विभागातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे प्रलंबित मानधन लवकरात लवकर देणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 5:41 pm

Web Title: kolhapur emphasis on tests to reduce corona patients and mortality health minister rajesh tope instructions msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी”
2 “प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी, कारण …”; रामदास आठवलेंचा पवारांना खास सल्ला!
3 गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर अज्ञात युवकांकडून पाळत
Just Now!
X