चंदगड तालुक्यातील एव्हीएच कंपनीच्या रासायनिक प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी िहसक वळण लागले. हजाराहून अधिक संतप्त आंदोलकांनी एव्हीएच कंपनीच्या आवारात घुसून तेथील मुख्यालय, प्रकल्पस्थळ व साहित्याची नासधूस करत जाळपोळ केली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी प्रकल्पाला स्थगिती देत असल्याचे सांगूनही समाधान न झाल्याने आंदोलकांनी लेखी आश्वासनाची मागणी करीत पोलिसांच्या समोरच पुन्हा जाळपोळ सुरू केली. पोलीस गाडी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची गाडी यावर जोरदार दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या चंदगड तालुक्यात एव्हीएच कंपनीचा रासायनिक पदार्थ बनविणारा प्रकल्प उभा राहिलेला आहे. प्रकल्पास गेल्या तीन वर्षांपासून स्थानिकांचा विरोध आहे. हा प्रदूषणकारी प्रकल्प याठिकाणी नको अशी इथल्या जनतेची सातत्याने मागणी आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्थगिती देण्याची सूचना केली असतानाही त्याकडे पर्यावरण खात्याने साफ दुर्लक्ष करत २१ जानेवारीला या प्रकल्पाच्या उत्पादनाला परवानगी दिली. उत्पादन सुरू होऊन एक महिना झाला असून प्रकल्पातील प्रदूषित घटकांमुळे रहिवाशांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.
शनिवारी केंद्रीय पर्यावरणाची उच्चस्तरीय समितीचे पी. सी. बेंजामिन यांच्यासह तीन अधिकारी व कोल्हापुरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके एव्हीएच प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्याशी राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदा बाभुळकर, एव्हीएच प्रकल्प विरोधी कृती समितीचे निमंत्रक लक्ष्मणराव पाटील व काही कार्यकत्रे चर्चा करीत होते. याचवेळी प्रकल्पस्थळी जमलेल्या हजाराहून अधिक नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी एव्हीएच कंपनीचे कार्यालय, प्रकल्प पेटवून दिला. प्रकल्पाला पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना उद्ध्वस्त केली. प्रकल्पस्थळी अपुरे पोलीस होते. पण त्यांच्या प्रतिकाराला न जुमानता जमवाने पोलीस गाडीच पेटवून दिली. संतप्त आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची गाडीही पेटवून दिली.