जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा कोल्हापूर-सांगलीच्या पूर पाहणी दौऱ्यातील सेल्फीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टिकेची झोड उठवली होती. या व्हिडिओत महाजन हसत हात हलवताना दिसत असल्याने नेत्यांमधील संवेदनशीलता हरवल्याची टीका विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या या टिकेला मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

गिरीश महाजनांनी पूरग्रस्त भागात कोणताही सेल्फी घेतला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फैलावर घेतलं.  शनिवारी सांगलीमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त भागात केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. महाजन यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाजनांवर टीका केली होती.

कोल्हापूर आणि सांगलीत यावर्षी विक्रमी पाऊस झाला. पूरस्थिती इतकी भीषण होती की तिथे जाणे कुणालाही शक्य नव्हते. अशा परिस्थितीतही गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले. त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्यांनी कोणताही सेल्फी घेतला नाही. बोटीमधून सोडायला येणाऱ्यांना त्यांनी हात दिला होता. ते फुटेज एडिट करुन त्याचा गैरवापर करण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

मुसळधार पाऊस, कोयनेतील विसर्गामुळे पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वरत करण्यावर सध्या सरकारने भर दिला आहे. विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणिवा दाखवून द्या पण राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केलं आहे. आपल्याला राजकारण करण्यासाठी बराच वेळ आहे. सध्या राजकारण करण्याची ही योग्य वेळ नव्हे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

काय आहे प्रकरण?
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ कोल्हापुरमधील असून गिरीश महाजन पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बोटीत बसून पुराची पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती हातात मोबाइल घेऊन सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत आहे. या व्हिडीओत आपण फ्रेममध्ये आल्यानंतर गिरीश महाजन हसत हात हलवताना दिसत आहे. पुराच्या ठिकाणी अशा पद्धतीने हसून दाद दिल्याने गिरीश महाजन यांच्यावर टीका होत आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ –