News Flash

कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांचं आंदोलन, धैर्यशील माने यांच्यासमोर मारल्या नदीत उड्या

मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ केलं जावं यासाठी गेल्या काही दिवसांपासून या महिलांचं आंदोलन सुरु आहे

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांनी शुक्रवारी केलेल्या आंदोलनाला आक्रमक वळण लागले. गांधीनगर येथे पंचगंगा नदीच्या तीरावर जमलेल्या महिला आंदोलकांनी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर नदीत उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मायक्रो फायनान्सकडून घेतलेली कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरात शिरोळ तालुक्यातील महिलांचे आंदोलन सुरु आहे.

मात्र हे आंदोलन आज चिघळलेलं पहायला मिळालं. पूरग्रस्त महिलांच्या आर्थिक पिळवणुकीकडे स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने महिलांनी थेट पंचगंगा नदीमध्ये उडी घेतली. हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी तातडीने नदीमध्ये उड्या घेत महिलांना पाण्यातून बाहेर काढले. या सगळ्या प्रकारात एक महिला आंदोलक बेशुद्ध पडली.

जोपर्यंत मुख्यमंत्री आंदोलकांशी चर्चा करत नाहीत अथवा कर्जमाफीचा आदेश काढत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दिव्या मगदूम यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आंदोलनस्थळी भेट देऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील माने यांनी केला.मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यासंबंधी बोलताना धैर्यशील माने यांनी सांगितलं आहे की, “हजारो महिला त्या ठिकाणी जमल्या आहेत. मायक्रो फायनान्सचं या भागात आर्थिक जाळं आहे. पुरामुळे या महिलांना कर्ज फेडणं शक्य नाही. फार थोडे बचतटगट आहेत. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे त्याप्रमाणे आम्हाला दिली जावी अशी त्यांची मागणी आहे. मी यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोणतीही वसूली पूरग्रस्त भागात होऊ नये असे आदेश जिल्हाधिऱ्यांनी दिले आहेत. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून पुढील आठवड्यात भेटून चर्चा करणार आहोत”.

दरम्यान, आज कोल्हापुरात तिन्ही मंत्र्यांचे जोरदार स्वागत झाले. स्वागत समारंभ आटोपल्यावर राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना महिलांनी घेराव घालून प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2020 3:15 pm

Web Title: kolhapur flood affected woman protest shivsena mp dhairyasheel mane sgy 87
Next Stories
1 कोल्हापूरमधील विजयाने आघाडीचा आत्मविश्वास दुणावला
2 कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला धक्का
3 महाविकास आघाडीचा प्रयोग ग्रामीण भागात यशस्वी
Just Now!
X