महापूराचे संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात तरी कसा येतो? असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर खरमरीत टीका केली होती. पूरस्थितीमुळे भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली पत्रकार परिषदेत केली होती.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पुराच्या संकटात आपण राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असे आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शनिवारी पत्रकार परिषदेत विरोधाकांना राजकारण न करण्याचे आवाहन केलं होतं.

पूरस्थितीचा खंबीरपणे सामना करणे गरजेचे आहे. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे. शिवसेना म्हणून जे काही करणे शक्य असेल ते आम्ही करतोच आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना शिवसेनाचा मदतीचा हात आहे. जणूकाही आभाळ फाटलं आणि हे संकट ओढवलय अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याची गरजेच असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

चादरी, ब्लँकेट, पाणी, औषधे, गुरांचे डॉक्टर्स कारण त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे, जवळपास १०० डॉक्टरांची टीम आम्ही पाठवली आहे. माणसांसाठी आणि जनावरांसाठी जे काही शक्य आहे ते आम्ही करतो आहोत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेना म्हणून जे काही करणे शक्य असेल ते आम्ही करतोच आहे. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलीक यांच्यासह तमाम शिवसैनिक नागरिकांसोबत पाण्यात राहून मदतकार्य करत आहेत.

काय म्हणाले होतो राज ठाकरे ?

सत्तेचा माज आला आहे. महापुरासारखी घटना घडली तरीही हे सरकार दुर्लक्ष करतं आहे. राजकारण एके राजकारण करत बसायचं हेच या सरकारचं काम आहे अशीही खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जी भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना यात्रांची नाटकं कसली सरकारकडून केली जात आहेत? पूरस्थिती निर्माण झाल्या झाल्या तिथे लष्कर का पाठवलं नाही? जे नुकसान झालं आहे ते भरुन यायला, माणसं स्थिर व्हायला वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक येते आहे. ती पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तसंच आपण यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे असंही त्यांनी म्हटलं