विद्यार्थिनीला ५०० उठाबशा काढण्याची अमानूष शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. अश्विनी अशोक देवाण असे या मुख्याध्यापिकेचे नाव असून भारतीय दंड संहितेतील कलम ३२३, ३२५, ३३६, ३३७ आणि ५०६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र हे जामीनपात्र कलम असल्याने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कानूरबुद्रक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवीच्या विद्यार्थिनीला ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी दिली होती. हिंदी विषयातील पत्रलेखन आणि समानार्थी शब्दांसंदर्भात विद्यार्थ्यांना एक प्रकल्प देण्यात आला होता. वर्गातील सात विद्यार्थ्यांनी प्रकल्प वेळेत दिला नव्हता. यामुळे मुख्याध्यापिका अश्विनी देवाण संतापल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. शाळेतील एका विद्यार्थिनीने ३०० उठाबशा काढल्या, मात्र नंतर प्रकृती खालावल्याने ती जागेवरच कोसळली. हा गंभीर प्रकार निदर्शनात आल्यानंतर या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवण्यात आला होता. यानंतर मुख्याध्यापिका देवण यांचे वेतन रोखण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवालही दिला होता. सुभेदार यांनी पीडित मुलीच्या गावी जाऊन तिची चौकशी केली होती. अन्य विद्यार्थ्यांसमोर एखाद्याला उठाबशा काढण्याची शिक्षा देणे अयोग्य असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गुरुवारी पोलिसांनी अश्विनी देवाण यांना अटक केली.