करोना विषाणूचे रुग्ण पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आढळल्याने इतर शहरांमध्ये पुरेशी दक्षता घेतली जाते आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंगळवार पासून महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या हातावर सॅनिटायझर लावूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

करोना विषाणूचा प्रसार भारतात सुद्धा झाला आहे. पुणे शहरातही दोन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात भाविकांना खबरदारीचा उपाय म्हणून मंदिराच्या चारही प्रवेशव्दारावर देवस्थान समितीच्यावतीने ‘स्टेरेलियम लिक्विड’चा वापर केला जात आहे. प्रत्येक भाविकांच्या हातावर सॅनिटायझर लावूनच त्यांना दर्शनासाठी सोडले जात आहे. आज सकाळ पासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अशाप्रकारे खबरदारी घेतली जात आहे. समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव आणि देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘भाविकांसाठी मंदिर उघडल्यापासून ते मंदिर बंद होईपर्यत हँड सँनिटायझर देण्यात येणार आहे. मंदिर आणि शहरात खबरदारी घेण्याबाबतचे फलक लावण्यात आले आहे.’

कोल्हापुरात रेड अलर्ट – सतेज पाटील
करोना विषाणूमुळे जिल्हा प्रशासनाने अतिदक्षतेचा उपाय योजना केली आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात यापूर्वीच पुरेशी दक्षता घेतली आहे. अभिप्रेत असणाऱ्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय येथे यंत्रणा सतर्क केली आहे.’

हज यात्रेकरू परतले
कोल्हापूर जिल्ह्यातील ४० मुस्लिम भाविक हज यात्रेसाठी मक्का मदिना येथे गेले होते. करोना विषाणूमुळे गेला आठवडाभर ते शहरात परत येण्यासाठी धडपडत होते. खासदार संजय मंडलिक यांनी विदेश विभागाकडे पाठपुरावा केला होता. नवी दिल्ली येथे त्यांची कसून तपासणी करून मुंबईला पाठवण्यात आले. तेथून कोल्हापुरात पोहचल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.