कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिर हे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. फक्त विधीवत पूजा केली जाणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही घोषणा केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जोतिबाची यंदाची यात्राही रद्द करण्यात आली आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेगावचं गजानन महाराज मंदिर, शिर्डी येथील साईबाबा मंदिर, तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, देहू येथील तुकाराम महाराज मंदिर, आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिर ही मंदिरंही बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्या देवस्थांनांनी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचं कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर सर्व धर्मीयांना मी आवाहन करतो की करोनाचं संकट टळेपर्यंत सगळ्यांनीच या प्रकराचा निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज मंदिर आणि इतरही मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना ३१ मार्च पर्यंत मंदिरात न येण्याचं आवाहन केलं आहे. त्यापुढचाही निर्णय़ परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे.