साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिरात नवरात्रोत्सव ऐन भरात असताना पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादात मंदिराची सुरक्षा यंत्रणाच काढून घेत हजारो भाविकांना वाऱ्यावर सोडण्यात आले. शुक्रवार रात्रीपासून शनिवार दुपापर्यंत पोलिसांच्या सुरक्षेशिवाय सुरू असलेल्या या उत्सवात मोठा गोंधळ उडाला, धक्काबुक्की, चोरीच्या अनेक घटना घडल्या.    
मंदिर सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलिसांनी चिरीमिरी घेऊन भक्तांना थेट दर्शन घडविल्याची तक्रार उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे दाखल झाली. याची गंभीर दखल घेत त्यांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयवंत खाडे व उपनिरीक्षक जमादार यांना शुक्रवारी रात्री महालक्ष्मी मंदिरातील पोलीस बंदोबस्त काढण्याचा आदेश दिला. त्या जागी मंदिराचे ६० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. पण सुमारे १५० पोलीस कर्मचारी नसल्याने गर्दीवर नियंत्रण सैल होत गेले. दुसरीकडे पोलीस अधिकारी असे सांगतात की, संजय पवार यांच्या नातलगांना दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यास पोलिसांनी नकार दिला त्यातून अहंकार दुखावलेल्या पवारांनी पोलीस बंदोबस्त काढून घेण्याचा आदेश दिला. तशी नोंदही पोलीस ठाण्याच्या नोंदवहीत रात्री करण्यात आली.