21 April 2019

News Flash

पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पक्षाची स्थापना

'महाराष्ट्र क्रांती सेना' असे या पक्षाचे नाव असून सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखेर राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली असून गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ असे या पक्षाचे नाव असून सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासाठी‘एक मराठा ..लाख मराठा’ अशा घोषणा देत लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. मराठा समाजाचे प्रश्न धसास लावण्यासाठी अशा राजकीय पक्षाची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पक्षस्थापन करण्यासंदर्भात सप्टेंबर महिन्यात मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात राजकीय पक्षाची स्थापना करणार, अशी घोषणा करण्यात आली होती. यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना असे या पक्षाचे नाव आहे. पक्ष स्थापनेस मराठा समाजातील काही लोकांचा विरोध होता. या विरोधाला डावलून पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले यांचा या पक्षाला पाठिंबा आहे, असा दावाही सुरेश पाटील यांनी केला असून पक्षाच्या घोषणेनंतर मराठा समाजातील हजारो तरुण रायरेश्वर गडावर पोहोचले आहेत.

वाचा: मराठा समाजाच्या राजकीय पक्षावरून वादाचे फटाके

‘मराठा समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झाला असून या मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ’, असे सुरेश पाटील यांनी सांगितले. ‘मराठा क्रांती मोर्चातील काही लोकांचा पक्षाच्या नावावर आक्षेप होता. मराठा क्रांती मोर्चा असे नाव देऊ नये अशी त्यांची भूमिका होती. यानुसार आम्ही पक्षाचे नाव महाराष्ट्र क्रांती सेना असे ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

‘रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटना आमच्या पाठिशी आहे. समाजातील सर्व घटकांना या पक्षात सामील करुन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. उदयनराजे भोसले यांनी पक्षाला पाठिंबा दिला आहे. मात्र, उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

First Published on November 8, 2018 1:10 pm

Web Title: kolhapur maratha reservation demand political party formed in maharashtra kranti sena raireshwar temple