करोना विलगीकरण केंद्रामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडल्याने, या केंद्रातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.

शिवाजी विद्यापीठात असलेल्या करोना विलगीकरण केंद्रामध्ये अल्पवयीन  मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमेश्वर कासे ( रा. पन्हाळा) या व्यक्तीच्या विरोधात राजाराम पोलीस ठाण्यांमध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. असाच प्रकार गेल्या महिन्यात इचलकरंजी येथे घडला होता. त्यामुळे करोना विलगीकरण केंद्रातील सुरक्षितता धोक्यात आल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

महिलांना स्वतंत्र कक्षाची मागणी

शिवाजी विद्यापीठ येथील करोना विलगीकरण केंद्रामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंगचा धक्कादायक प्रकार घडला. ह्यातून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात देखील अशा घटना समोर आल्या आहेत. सरकारी आरोग्य संस्थेत असे लांच्छनास्पद प्रकार घडत असतील, तर हे प्रशासनाचे अपयश म्हणावे लागेल. यासाठी विलगीकरण केंद्रात महिलांना स्वतंत्र कक्ष करण्याची मागणी भाजपा कोल्हापूर महानगर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी ईमेल द्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवरी केली.