कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी धरणातील विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. कोल्हापूर शहराच्या काही भागांमध्ये पाणी घुसले आहे. प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुफानी पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राधानगरी धरण काल संध्याकाळी भरल्यानंतर दोन दरवाजे उघडण्यात आले होते तर शुक्रवारी आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्यामुळे पंचगंगा, भोगावती या नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे.

पंचगंगा नदी शुक्रवारी सायंकाळी कालपेक्षा अधिक दोन फुट म्हणजे धोका पातळीहून अधिक म्हणजे ४५ फुटावरून वाहत होती. पाणलोट क्षेत्रामध्ये आजही पाऊस पडत असला तरी त्याची गती कमी आहे. कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप सुरू होती. मात्र पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी नागरी कुंभार गल्ली, सुतारवाडा तसेच बापट कॅम्प भागातील टोलेजंग इमारतीचा भाग असलेल्या ठिकाणी आले आहे.

स्थलांतरास गती

जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे २३ गावांमधील १८७८ कुटुंबातील ५५६१ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. करवीर तालुक्यात ३ बाधित गावांमध्ये ४८६१ व्यक्ती आणि १०३८ जनावरे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील ५० कुटूंबातील १७२ नागरिकांना चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरीत केले आहे.