गावाकडे परतण्याची ओढ लागली असतानाही शेकडो परप्रांतीयांनी प्रवासाला सुरुवात झाल्यावर देशप्रेमाची प्रचीती दिली. ‘भारत माता की जय !’ अशा घोषणा देत उत्तरप्रदेशमधील सुमारे दीड हजार मजूर श्रमिक विशेष रेल्वेने बुधवारी दुपारी प्रयागराजकडे रवाना झाले.

राज्य शासनाने परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची तयारी केली आहे. ज्या राज्याकडून अनुमती मिळेल त्या भागात रेल्वे सोडली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मजूर उत्तरप्रदेश मधील आहेत.  राज्यशासनाने शासनाकडून मंजुरी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली.

दोन दिवसाची शिदोरी –

थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या मजुरांशी संवाद साधत त्यांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. आज आणि उद्यासाठी त्यांना लागणाऱ्या जेवणाचे संच त्यांनी या मजुरांना दिले. महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, संदिप कवाळे, गुलाबराव घोरपडे, उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार विजय देवणे या दोन्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी हस्ते हिरवा झेंडा दाखवल्या नंतर प्रयागराजकडे रेल्वे मार्गस्थ झाली.