News Flash

कोल्हापूर : पंचगंगा नदी इशारा पातळीवर; अलमट्टीचा धोका टाळण्याचा प्रयत्न

काळम्मावाडी व राधानगरी धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने पुराचा धोका!

(फोटो -शिवम बोधे )

कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. मंगळवारी पंचगंगा नदीने इशारा पातळीवर पोहचली आहे. काळम्मावाडी व राधानगरी या दोन्ही मोठ्या धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने सावधगिरीचा इशारा देत लोकांचे स्थलांतर सुरू केले आहे. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आला आहे. तर, अलमट्टीचा धोका टाळण्याचा प्रयत्न आजही मंत्री पातळीवरून सुरू राहिला.

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर  सलग तीन दिवसांपासून  कोल्हापूर  शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने  पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण पूर्ण  भरल्याने या धरणाचे पाच दरवाजे उघडले असून त्यातून सुमारे सात हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

या दोन्ही धरणातील पाण्याचा विसर्ग आणि पाऊस यामुळे यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. सायंकाळी पंचगंगा नदी इशारा पातळीवर  पोहचली होती. कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका जाणवू लागला आहे. काळम्मावाडी धरण परिसरात आज पावसाचा जोर कायम होता. दूधगंगानगर म्हणून ओळखले जाणारे हे धरण ९३ टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून साडेअकरा हजार तर जल विद्युत केंद्रातून अठराशे  असा सुमारे १३ हजार क्यूसेस विसर्ग नदीपात्रात सुरू होता. लोकांना सतर्कतेचा आदेश दिला आहे हे धरण २३. ६४ टीएमसी इतके भरले आहे.

लोकांना दवंडी पिटवून स्थलांतरित होण्याच्या सूचना –

पूरग्रस्त गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफचे पथक करवीर तालुक्यातील चिखली गावात पोहचले असून, हे पथक आणि स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दवंडी पिटवून दिल्या जात आहे. सायंकाळपर्यंत पंचवीस टक्के लोकांचे स्थलांतर झाल्याचे तहसीलदार शीतल मुळे – भामरे यांनी सांगितले.

पुरस्थितीची मंत्र्यांकडून पाहणी

पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. शिरोळ तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज नदीकाठावरील नरसिंहवाडी गावासह राजापूर, तेरवाड येथील बंधाऱ्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. शिरोळ तालुक्याला कर्नाटकातील अलमट्टी धरणातील फुगवण्यामुळे महापुराचा धोका निर्माण होतो. यामुळे तेथील विसर्ग वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आजही त्यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. काल दोन लाख लिटर पाण्याचा विसर्ग होता त्यामध्ये आज आणखी पन्नास हजार वाढ करण्यात आला असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 7:37 pm

Web Title: kolhapur panchganga river exceeds warning level msr 87
Next Stories
1 राहुल गांधींची वक्तव्यं गांभीर्याने घेत नाही : देवेंद्र फडणवीस
2 आपल्याकडं किमयागार आहे, थोडा संयम ठेवा; मनसेचं कार्यकर्त्यांना आवाहन
3 ‘राजसाहेब माफ करा..’ म्हणत मनसे पदाधिका-याची आत्महत्या
Just Now!
X