कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे इनाम दिले जाईल, अशी घोषणा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रविवारी येथे केली. पोलिसांच्या तपासात अद्याप हल्लेखोरांचे कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत.
पानसरे दाम्पत्यावर गोळीबार होऊन पाच दिवस लोटले. या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची २० पथके, मुंबई क्राइम बँच यांच्याकडून अहोरात्र तपास केला जात आहे. अनेकांना ताब्यात घेऊन चौकशीही केली आहे. मात्र अद्याप पोलिसांना ठोस माहिती उपलब्ध झाली नाही. त्यातूनच पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनाने बक्षीस देण्याचे ठरविले आहे. माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपये दिले आहे.
संसदेतही पडसाद उमटणार
दरम्यान, पानसरे यांच्या हत्येचा मुद्दा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. संसदेच्या दोन्ही सभागृहांतही हत्येचा मुद्दा गाजणार असून कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांकडून तो मांडण्यात येणार आहे. कम्युनिस्ट नेते डी. राजा, सीताराम येचुरी आदी नेत्यांकडून अ‍ॅड. पानसरे यांच्या हत्येचा मुद्दा संसदेत उपस्थित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी रविवारी केलेल्या चर्चेत काही नेत्यांनी त्याबाबत सूतोवाच केले. हा मुद्दा संसदेत जेव्हा मांडला जाईल, तेव्हा शिवसेनेकडूनही राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली जाण्याची शक्यता आहे.
रास्ता रोको, धिक्कार मोर्चा, बंद
गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको करण्यात आले. वरळीत निषेध मोर्चा काढण्यात आला. तर नाशिक शहर व जिल्ह्य़ात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर बंदला  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील व्यवहार बंद राहिले. आरपीआयतर्फे  ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश ठिकाणी दुकाने बंद होती. हत्येचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोर्चाही काढला. गोविंद पानसरे अमर रहे, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. तर उस्मानाबादेतील  व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.नेहरू चौकातून निघालेल्या निषेध मोर्चात मोठय़ा संख्येने नागरीक सहभागी झाले होते.