कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी बुधवारी १३ फूटांवर पोहोचली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी दहा वाजता ही पातळी २६ फूटांवर झाली आहे. पाणी पातळीत वाढ मोठया प्रमाणात होऊ लागल्याने प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कोल्हापूर गारगोटी मार्गावरील एका ओढयावरील पर्यायी पूलाचा भराव रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे.

कोल्हापूर – गारगोटी मार्गावर माजगाव-चंद्रे यादरम्यान एक ओढा आहे. तेथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याला लगतच पर्यायी रस्ता तयार करण्यात आल आहे. या रस्त्याचा भराव पहिल्याच जोरदार पावसामुळे वाहून गेला. सुमारे १५ ते २० फूट अंतराचे भगदाड रस्त्याला पडले आहे. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक खंडीत झाली आहे. रस्ता वाहून गेल्याने दैनंदिन व्यवहार व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. बिद्री सहकारी साखर कारखाना जवळ राधानगरी तालुक्यात चंद्र हे गाव आहे.