कोल्हापूरजवळील ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात देवीचे मुकूट व अन्य दागिने चाोरीला गेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असले तरी ते गेल्या काही दिवसांपासून बंद होते.

कोल्हापूरजवळ कात्यायनी देवीचे मंदिर असून नयनरम्य परिसरात हे मंदिर वसले आहे. या ऐतिहासिक मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरवाजा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. देवीचे मुकूट, छोटे दागिने असे एकूण दोन किलोंचे दागिने चोरीला गेले. मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी पहाटे ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंदिरातील देणगी पेटीतील रक्कम व अन्य मौल्यवान वस्तूंना चोरट्यांनी हात लावलेला  नाही.

मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असले तरी ते बंद आहेत. मंदिरातील पुजारी रामचंद्र गुरव हे मंदिराच्या आवारातच राहतात. सकाळी मंदिरात आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.