भाजपच्या पूरग्रस्त सहायता समितीतर्फे पूरग्रस्त १०० गावांतील शाळांची साफसफाई व दुरुस्ती करून देण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जाहीर केले. समितीची बैठक गुरुवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस समितीचे संयोजक रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, नीता केळकर व किरीट सोमय्या, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., भाजप सांगली शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ व भाजप सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच असे २० हजारांपेक्षा अधिक लोकप्रतिनिधी असून त्यांनी दिलेल्या निधीतून आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निधीतून पूरग्रस्तांसाठी निधीसंकलन झाले आहे.

पूरग्रस्त शंभर गावातील शाळांची साफसफाई व दुरुस्ती भाजपातर्फे करण्यात येईल. पुराच्या पाण्यामुळे शाळांमध्ये बुरशी वाढली आहे, तेथे पेस्ट कंट्रोल करून देण्यात येईल. तसेच भिंती पडल्या आहेत किंवा कुंपण पडले आहे तेथे दुरुस्ती करण्यात येईल. पूराच्या पाण्यात बुडालेल्या शाळांची रंगरंगोटी करून देण्यात येईल. या कामासाठी गावातील लोकांचीच समिती तयार करण्यात येईल. कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. गावातील कंत्राटदार ठरेल व समितीतर्फे दर आठवड्याला त्या त्या गावचा प्रमुख सांगेल त्याप्रमाणे निधी देण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शाळांच्या दुरुस्तीप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रे, आंगणवाड्या यांनाही मदत केली पाहिजे व त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी भाजपाच्या पूरग्रस्त सहायता समितीला निधी द्यावा, असे आपले आवाहन आहे, असेही ते म्हणाले.