मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मागील ४० वर्षे संगीतकार, गायक, उत्कृष्ट तबलावादक आणि अभिनय अशा विविध स्तरांवर ठसा उमटवलेले कोल्हापुरमधील चंद्रकांत कागले(वय-५६) यांचे आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे.

संगीतकार म्हणून त्यांनी प्रसन्न कुलकर्णीचे “अजा ग अजा” हे पहिले नाटक संगीतबध्द केले होते. यानंतर त्यांचा मित्र विजय पाठक यांच्याबरोबर सिनेसृष्टीमधे संगीतकार चंद्र-विजय या जोडीने वसंत पेंटर यांचा सड़ा हळदी कुंकवाचा, बाळू मामाच्या नावानं चांगभलंसाठी काम केले. सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ति, साधना सरगम, स्वप्निल बांदोडकर, शंकर महादेवन अशा नामांकित गायक कलाकरानी या संगीतकार जोड़ीच्या दिग्दर्शनाखाली गायन केले आहे. त्यांनी अनेक नामवंत गायकांना साथ संगत केली त्यामध्ये अनुप जलोटा अरुण दाते अनुराधा पौडवाल चंद्रशेखर गाडगीळ आदींचा समावेश आहे. तसेच, त्यांनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले होते. जितेंद्र देशपांडे दिग्दर्शित सप्त पुत्तुलिका या नाटकासाठी देखील त्यांनी संगीत दिले होते.

चंद्रकांत कागले, विजय पाठक या जोडीने ‘फरमाईश ए गझल’ या कार्यक्रमाचे सुमारे पाच हजार कार्यक्रम भारतभर तसेच परदेशात सादर केले. चंद्रकांत कागले, विजय पाठक, उदय सुतार, श्रीकांत साळोखे यांनी मिळून ‘सुरभि ऑर्केस्ट्रा’ची निर्मिति केली होती. ‘चंदू’ नावाने ते चित्रसृष्टीत ओळखले जात. अलिकडेच त्यांनी झी टीव्ही, ई मराठी अशा विविध वाहिनीच्या मराठी मालिकांमधे विविध भूमिका केल्या होत्या.