ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचं मंगळवारी पहाटे कोल्हापूर येथे निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेळगावमधील यमुनापूर या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

डॉ. गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी मोठं काम केलं आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. डॉ. गस्ती यांनी गावातील शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयात त्यांनी पीएचडी मिळवली होती. डॉ. गस्ती यांनी सामाजिक कार्यासह लेखनही केलं. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि छळाचं चित्रण त्यांनी ‘बेरड’ या आत्मचरित्रातून मांडलं. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. आक्रोश आणि सांजवारा ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.

वंचितांचा आवाज निमाला: मुख्यमंत्री

देवदासी प्रथेच्या निर्मूलनासह भटक्या-विमुक्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरपर्यंत लढणाऱ्या डॉ. भीमराव गस्ती यांच्या निधनाने वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. गस्ती यांनी उत्थान या संस्थेच्या माध्यमातून देवदासींच्या पुनर्वसनासह बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही त्यांच्या संस्थेने केलेले कार्य मोलाचे आहे. उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. गस्ती यांनी आपले संपूर्ण आयुष्य देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी वाहिले होते. देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. यासोबतच बेरड हे आत्मचरित्र, तसेच आक्रोश, सांजवारा आदी साहित्यकृतींच्या माध्यमातून वंचित-उपेक्षित घटकांचे प्रश्न त्यांनी ऐरणीवर मांडले होते. त्यांच्या निधनाने एका तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्यासोबतच प्रतिभावंत साहित्यिकही गमावला आहे, असे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.