कोल्हापुरात टोलवसुलीला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर त्याचा विरोध करण्यासाठी शहराच्या महापौरांसह, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे सभापती यांनी शुक्रवारी आपली शासकीय वाहने महापालिकेकडे जमा केली. या सर्व पदाधिकाऱयांकडे असलेले महापालिकेचे मोबाईल आणि दूरध्वनीही परत करण्यात आले आहेत. टोलवसुलीचा निषेध करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी शहरात टोलवसुली पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्वपक्षीय ८२ नगरसेवकांनी आपले राजीनामे महापौर सुनीता राऊत यांच्याकडे दिले होते. शुक्रवारी या सर्व नगरसेवकांनी आपापल्या पक्षाच्या शहराध्यक्षांकडे नगरसेवकपदाचे राजीनामे दिले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २५, कॉंग्रेसच्या ३३, जनसुराज्य शक्तीच्या १०, शिवसेना-भाजप युतीच्या ९ आणि स्वीकृत ५ सदस्यांचा समावेश आहे.
कोल्हापुरातील रस्तेबांधणीसाठी किती खर्च आला, याचे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. १५ दिवसांच्या आत हे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापुरातील सामान्य जनजीवन शुक्रवारी सुरळीत सुरू असून, पोलीस बंदोबस्तात टोलवसुलीही सुरू आहे.