कोल्हापुर जिल्ह्यातील धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राधानगरीतील तुळशी धरणात स्वातंत्र्य दिनानिमित्य रात्री तिरंगी विद्युत रोषणाई करून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. हा अनोखा रंगोत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पावसाळ्यात या धरणाकडे नागरिकांनी करोनामुळे पाठ फिरवली असली तरी या निमित्ताने काही क्षण ग्रामस्थांनी आनंदात घालवले. धरणाला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याला (विसर्ग) देशप्रेमाची झालर लावण्याचा हा पहिलाच प्रयत्न ठरला.

कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर राधानगरी शहर आहे. राधानगरी तालुक्यामध्ये शाहूकालीन राधानगरीसह काळम्मावाडी (२९ टीएमसी) आणि तुलसी (धामोड) ३ (टीएमसी) ही धरणे बांधण्यात आली आहेत.

कोल्हापूर-राधानगरी राज्य महामार्गावर आमजाई व्हरवडेपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या निसर्गसंपन्न धामोड गावच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना खुणावत असतात. रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, वनराई येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

अशी सुचली, साकारली कल्पना –
तुळशी धरण यंदा पावसाळ्यात पूर्ण भरले आहे. धरणाला १२ बाय ५ मीटर अंतराचे तीन वक्राकार दरवाजे आहेत. धरण भरल्यामुळे त्यातून प्रत्येक दरवाजातून १२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यालयांमध्ये विद्युत रोषणाई करण्याची सूचना प्रशासनाकडून दिली जाते. याच पार्श्वभूमीवर यंदा धरणाला भारतीय ध्वजातील तिरंगी रंगातील रोषणाई करण्याची कल्पना सुचली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, रोहित बांदिवडेकर, प्रताप माने या अधिकाऱ्यांनी होकार दिल्यानंतर स्थानिक कामगारांकडून रोषणाई करून घेण्यात आली. काल रात्री वक्राकार दरवाजातून पाणी वाहत असताना तिरंगी रोषणाई झाल्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. जवळपास हजार लोकं हा रंगोत्सव अनुभवण्यासाठी उपस्थित होते.

आमदार प्रकाश आबिटकर यांनीही हा सोहळा अनुभवला. याचे व्हिडिओ समाज माध्यमातून सर्वत्र पसरल्यानंतर लोकांनी आणखी काही काळ काही दिवस ही रोषणाई सुरू ठेवावी, अशी मागणी केली. त्यानुसार रविवार, सोमवार असे दोन दिवस ही रोषणाई सुरू ठेवण्याचा विचार आहे, असे तुळशी धरणाचे शाखा अभियंता विजय आंबोळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.