भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषद सदस्यांची बैठक २३ व २४ मे रोजी करवीरनगरीत (कोल्हापूर) होणार आहे. या निमित्त येणाऱ्या प्रतिनिधींना बैठकीची आठवण म्हणून ‘कोल्हापुरी चपले’चा जोड दिला जाणार आहे! मात्र, भाजपच्या या अभिनव योजनेवर काँग्रेसने टीका केली आहे.
या बैठकीची जय्यत तयारी सुरू असून, प्रत्येक जिल्ह्य़ातील अध्यक्ष, सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषद सदस्यांशी वैयक्तिक संपर्क साधून निमंत्रण दिले जात आहे. नांदेडमधील काही पदाधिकारी व सदस्य ही बाब बाहेर कौतुकाने सांगत आहेत. व्यक्तिगत संपर्कातून प्रत्येकाला ‘पायाचे माप’ विचारले गेले. पण या चौकशीमुळे काही जण बुचकळ्यात पडले.
एक-दोघांनी आणखी चौकशी केली, तेव्हा बैठकीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला कोल्हापुरी चपलेचा जोड भेट दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूरनगरी झणझणीत मटण, तसेच त्यासोबत मिळणारा तांबडा-पांढरा रस्सा या साठी सुपरिचित आहेच. तसेच या शहरात तयार होणारी चप्पलही विख्यात असल्याने भाजपच्या बैठकीला आपली पादत्राणे घालून जाणाऱ्यांना परतीच्या प्रवासात आणखी एक चप्पल जोड मिळणार आहे. बैठकीपूर्वीच या अभिनव भेटीची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात काही भागात दुष्काळी स्थिती, अनेक भागात पाणीटंचाई आणि ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी हैराण असून ‘पायातले काढून सत्ताधाऱ्यांना मारावे’ अशी स्थिती असताना सत्ताधारी पक्ष चप्पल वाटपाचा कार्यक्रम करणार असल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी लगावला.

चप्पल पुराण!
यापूर्वीही २०१०मध्ये भाजपची राज्य परिषद कोल्हापूर येथे झाली होती. त्यावेळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची फोटोफ्रेम प्रतिनिधींना भेट देण्यात आली होती. त्यानंतर मधल्या काळात नाशिकला बैठक झाली, तेव्हा नाशिकचा प्रसिद्ध चिवडा दिला होता. आता पुन्हा कोल्हापूरला बैठक होत असताना थेट चप्पल दिली जात आहे! राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या बैठकीचे नियोजन आहे. दरम्यान, राज्यात सत्तेवर येऊन सहा महिने झाले असले, तरी कामासाठी कार्यकर्ते मंत्रालयात खेटे मारून थकले आहेत. मात्र, चपला झिजूनही कामे होत नाहीत. त्यासाठीच आता चप्पल भेट देण्याचे ठरविले असावे, अशी मार्मिक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधूनच व्यक्त होत आहे.