कोल्हापूर म्हटले की झणझणीत मटणाचा तांबडा पांढरा रस्सा आठवतो. त्यातही रविवारचा दिवस म्हटला की कोल्हापूकरांकडे मटण शिजणारच. २२ तारखेचा म्हणजेच उद्याचा रविवार तरी अपवाद कसा ठरेल? देशाच्या पंतप्रधानांनी उद्या रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. ते कोल्हापूरकर पाळणार आहेत. मात्र मटणापासून दूर राहणार नाहीत हे नक्की. त्यामुळेच शनिवारी मटणाच्या दुकानाबाहेर रांगा दिसून आल्या.

 

पाहा व्हिडीओ

देशात करोना विषाणूचा फैलाव होत आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत ‘स्वयंम संचारबंदी’ लागू करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्याला सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी ते गावपातळीपर्यंत याला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरकरांनी या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हायचे ठरवले आहे.
मात्र,त्याची तयारी कोल्हापूरकरांनी शनिवारी संध्याकाळपासूनच सुरू केली आहे.

रविवारचे मटण खाण्याचा शिरस्ता मोडायचा नाही हे त्यांनी मनोमनी ठरवले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून कोल्हापुरातील मटणाच्या दुकानासमोर गर्दी लागली होती. काही लोकप्रिय दुकानांसमोर तर रांगा लागलेल्या होत्या. तेथे वाहतूक कोंडी झाल्याचेही दिसून आले.

एरवी, कोल्हापुरात शनिवारी मटण खरेदी करण्यासाठी फारसे कोणी मटण दुकानाकडे फिरकत नाही. आजचा शनिवार त्याला अपवाद ठरला. कारण उद्या रविवारी सकाळपासूनच मटण दुकानं बंद असणार आहेत. त्यामुळे मटणाची खरेदी एक दिवस आधी म्हणजे आज शनिवारीच अनेकांनी केली आहे. कोल्हापूरकर हा मटणाचा खवय्या असल्याने त्याने बंदच्या पूर्वसंध्येला शनिवारी मटणाची खरेदी उरकून घेतली. त्यामुळे आज मटण विकण्यासाठी कमी पडले. शनिवारी मटणाची फारशी विक्री होत नसल्याने कमी प्रमाणात बकरी कापण्यात आली होती. हे मटण हातोहात विकले केल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले. तर, काहींनी चिकन, मासे, अंडी असा पर्याय निवडला. उद्याचा बंद अशाप्रकारे झणझणीत साजरा करण्याचा कोल्हापूरकरांचा मानस दिसत आहे.