गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देत मृत्यूशी सामना करत कुंभोत, तारदाळ, इचलकरंजी, आळते येथील ३९ यात्रेकरूंना खासदार राजू शेट्टींनी सुखरूप हरिव्दार येथे आणून वैद्यकीय मदत व जेवणाची व्यवस्था केली. गेल्या आठ दिवसांपासून गंगोत्री व यमनोत्री या भागात अडकलेले हे प्रवाशी ८ दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नाने सुखरूप पोहोचले. ७ जूनला गेलेले हे यात्रेकरू १६ जून रोजी यमनोत्री या ठिकाणी गेले होते. खासदार शेट्टी डेहराडून येथून बद्रीनाथकडे रवाना झाले आहेत. 
दरम्यान येथून पुढे ते केदारनाथकडे जात असताना यमनोत्रीच्या खोऱ्यामध्ये गाडीमध्ये बिघाड झाल्याने हे सर्व प्रवाशी त्या ठिकाणी थांबले व काही वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. पडणारा पाऊस पाहून या यात्रेकरूंनी केदारनाथकडे जाणे रद्द केले व परत परतीच्या मार्गावर येत असताना यमनोत्री खोऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणात जमीन खचली व हे प्रवाशी ज्या ठिकाणी होते तो यमनोत्री खोऱ्यातील पूल जमीनदोस्त झाला. पण पंधरा मिनिटे अगोदर हे यात्रेकरू तेथून बाहेर पडल्याने ते सुखरूप राहिले. या भागातील जवळपास ६ ते ८ कार गाडय़ा तेथेच गाडल्या गेल्या, असल्याची माहिती या प्रवाशांनी दिली. गेल्या आठ दिवसांपासून जंगलातून वाट शोधत काल रात्री उशिरा हे सर्व यात्रेकरू हरिव्दार येथे पोहोचले. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी त्या सर्वाची भेट घेऊन औषधे, जेवण व कपडे आदी बाबींची सोय केली.     
यामध्ये १८ पुरूष, ३ लहान मुले, १७ महिला व १ मुलगी असे ३९ यात्रेकरू सध्या सुखरूप आहेत. यावेळी त्यांनी गेल्या सात दिवसांत महाराष्ट्राच्या प्रशासनाची कोणतीही मदत मिळाली नसून हरिव्दार येथे आल्यानंतरच महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकारी भेटले असल्याची माहिती दिली. यामध्ये नारायण कुलकर्णी (कुंभोज), वसंतराव कदम (तारदाळ), वसंतराव हुक्कीरे (आळते), राजेंद्र परीट (इचलकरंजी) यांच्यासह त्यांचे नातेवाईक यामध्ये आहेत. दरम्यान खासदार शेट्टी यांनी सर्व मदत केंद्राच्या ठिकाणी स्वत भेट देऊन महाराष्ट्रातील यात्रेकरूंना आधार देण्याबाबत सांगून आपले दोन्ही मोबाईल नंबर सर्व मदत केंद्रावरती देऊन महाराष्ट्रातील यात्रेकरूंना संपर्क करण्यास सांगितले आहे.