तालुक्याच्या पश्चिम भागातील वेस, सोयेगाव, मनेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी आणि रांजणगाव देशमुख या सात गावांसाठी वरदान असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आठवडाभरात कार्यान्वित न झाल्यास अधिकाऱ्यांना पळता भुई थोडी करू, असा इशारा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिला.
गेल्या १६ वर्षांपासून रखडलेली पाणीयोजना तात्काळ कार्यान्वित करावी या मागणीसाठी या सात गावांतील नागरिकांनी येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. याप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हे म्हणाले, या योजनेच्या चाचणीसाठी संजीवनी कारखान्याच्या सहकार्याने दहा ते बारा पाण्याचे टँकर देऊ. संबंधित अधिकाऱ्यांनी या चाचणीत गळती शोधावी व त्याची दुरुस्ती करावी. अधिकारी गांभीर्याने त्याकडे लक्ष देणार नसतील तर लोकांच्या भावनांचा उद्रेक होईल. पाण्याच्या चालू आवर्तनात धोंडेवाडी पाझर तलाव व त्यानंतर या योजनेच्या साठवण तळय़ात पाणी घेऊन ती तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी त्यांनी केली. तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी याबाबत मंत्रालयात आत्मीयतेने पाठपुरावा होणे गरजेचे आहे असे सांगितले. येत्या ८ जुलैपर्यंत ही योजना सुरू न झाल्यास मुलाबाळांसह जीवन प्राधिकरणांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा या वेळी देण्यात आला.  
सुरुवातीला कृती समितीचे रामदास रहाणे व नानासाहेब गव्हाणे यांनी हा प्रश्न मांडला. ते म्हणाले, १९९७ मध्ये या योजनेस मंजुरी मिळाली. तत्कालीन आमदार शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांनी सन २००२ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात ही योजना सुरू करून या सात गावांना पाणी दिले. सुरुवातीच्या काळात वीजबिल व पाणीपट्टी संजीवनी कारखान्याने भरली, मात्र नंतरच्या आमदारांनी या योजनेकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. रामनाथ पाडेकर, कारभारी रहाणे, अप्पासाहेब कोल्हे आदी या वेळी उपस्थित होते.