कोट्यवधी रुपये किमतीचे परदेशी चलन देण्याचे आमिष दाखवून ६३ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या केनियन भामट्यास कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. मुथाय इसाह (वय ४५, रा. नारोबी, केनिया) असे संशयिताचे नाव असून, त्याला येथील कोहिनूर हॉटेलमधून ताब्यात घेतले.

भागीदारी करण्याच्या बहाण्याने परकीय चालनाद्वारे जास्तीत जास्त रक्कम देण्याच्या आमिष दाखवून तो फसवणूक करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अभिजीत हंबीरराव खराडे (वय २९, रा. तीनबत्ती चौक) या बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली होती. या व्यवहारात आठ कोटी ४० लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक होऊ शकली असती.

पोलिसांनी त्याच्याकडील साधनसामुग्री जप्त केली असून त्यामध्ये २०० अमेरिकन डॉलर, ५०० युरोज व भारतीय चलनातील १३ हजार रुपये, पाच मोबाइल, केमिकल, नोटांच्या आकारांचे काळे कागद, लॉकर आदी साहित्याचा समावेश आहे. या कारवाईमुळे परदेशी नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

इचलकरंजी येथील एका बांधकाम व्यावसायिकास मुथाय इसाह या केनियन नागरिकाने संपर्क साधून आपल्याकडे २० मिलियन युरोज आहेत. ते व्यवसायात गुंतवायचे आहेत. नोटा तयार करून देण्यासाठी ६३ लाख रुपयांचा खर्च येईल. तितके पैसे दिल्यास त्यापोटी तीन कोटी २० लाख रुपये देऊ, असे आमिष दाखवले. बांधकाम व्यावसायिकाने तयारी दर्शवल्यानंतर मुथाय याने इचलकरंजीत जाऊन त्यांना नोटा तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. बनावट नोटांचा संशय येताच व्यावसायिकाने याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक देशमुख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस तपास करण्याचे आदेश दिले. संशयित मुथाय हा कोल्हापुरातील कोहिनूर हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी सकाळी त्याला सापळा रचून अटक केली. चार दिवसांपूर्वी मुंबईमध्येही अशाच प्रकारचा गुन्हा उघडकीस आल्याने परकीय चलनाचे आमिष दाखवून फसवणूक करणारे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलिस निरीक्षक तानजी सावंत, सहायक फौजदार नेताजी डोंगरे, संजय पडवळ, अजय काळे, विलास किरोळकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.