News Flash

श्रीनगरच्या पुरात अडकलेले कोलते कुटुंबीय सुखरूप परतले

काश्मीरमधील पुराच्या पाण्यात तब्बल ७ दिवस अडकून पडलेले विलास ज्ञानदेव कोलते व त्यांचे कुटुंब आज, रविवारी सुखरूप नगरमध्ये व नंतर शहापूरमध्ये (ता. नेवासे) परतले.

| September 15, 2014 02:10 am

काश्मीरमधील पुराच्या पाण्यात तब्बल ७ दिवस अडकून पडलेले विलास ज्ञानदेव कोलते व त्यांचे कुटुंब आज, रविवारी सुखरूप नगरमध्ये व नंतर शहापूरमध्ये (ता. नेवासे) परतले. पर्यटकांच्या आधी स्थानिक नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करावी यासाठी तेथील नागरिकांनी लष्करावर आणलेल्या प्रचंड दबावामुळे सुटकेला विलंब झाला. याच कारणातून तेथील स्थानिकांनी पर्यटक अडकलेल्या हॉटेलवर केलेल्या दगडफेकीचा व ६ किलोमीटरची पायपीट, दोन लहान मुलांचे आजारपण याचा सामनाही कोलते कुटुंबीयांना करावा लागला. या सात दिवसांत अन्न पाण्यावाचून दिवस काढण्याचा प्रसंगही त्यांच्यावर ओढवला.
आज शहापूरला परतल्यानंतर विलास कोलते यांनी आपले अनुभव ‘लोकसत्ता’कडे कथन केले. जीवनातील सर्वात बिकट प्रसंगाला तोंड देऊन आपण परतलो, लष्कराने केलेल्या मदतीमुळेच सुटका झाली, या काळात माणुसकी आणि लोभीपणा अशा दोन्ही स्वभावांचा अनुभव मिळाला, असे ते म्हणतात. कोलते मुळचे शहापूरचे, मात्र सध्या नोकरीनिमित्त भरुच (गुजरात) येथे रिलायन्स कंपनीत आहेत. तेथूनच ते काश्मीरला गेले.
ते स्वत:, पत्नी गीतांजली, मुलगी मोनिषा (वय ७) व ध्रुव (६) असे चौघेजण पर्यटनासाठी काश्मीरला दि. ३ रोजी गेले होते. दि. ५ ते दि. ११ असे सात दिवस ते श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये अडकून पडले होते. हॉटेल पाच मजली होते व एक मजला पूर्ण पाण्याखाली होता. हॉटेलमध्ये केरळ, पंजाबसह मुंबई येथील एकूण १६० जण अडकलेले होते. हॉटेलच्या व्यवस्थापनाने या सर्वाना लेह-लडाख या दूरच्या मार्गे, नंतर विमानाने मुंबईकडे जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यातील धोका लक्षात घेऊन या सर्वानी लष्कराच्या मदतीवर भरवसा ठेवला.
हॉटेलमधील सर्वजण पाचव्या मजल्यावर जाऊन लष्कराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते, लष्कराच्या एका हेलिकॉप्टरमधून टाकण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्या व काही केळी पाण्यातच पडून वाहून गेली, स्थानिकांचा विरोध व नंतर केलेली दगडफेक यामुळे लष्कराची मदत पोहोचण्यासही विलंब झाला. या सात दिवसांत केवळ एक वाटीभर भात आणि दोन पुऱ्या व भाजी खाऊन दिवस काढावा लागला. केवळ २५०-३०० मीटर अंतरावर ‘बीएसएफ’ची सुरक्षित जागा होती, मात्र हे अंतर गाठण्यासाठी सर्वानाच सात दिवस वाट पहावी लागली. या त्रासातून कोलते यांची दोन्ही लहान मुले तेथेच आजारी पडली. नंतर हॉटेलचे व्यवस्थापनही पाण्याच्या एका बाटलीसाठी ७०, ८० रु. अकारू लागले होते.
सहा किमीची पायपीट केल्यावर कोलते कुटुंबीय राजभवनच्या सुरक्षित जागी पोहोचले. तेथेही श्रीनगर सोडण्यासाठी २० ते २५ हजार पर्यंटकांचा जमाव जमलेला होता. लष्करही वृद्ध, महिला, मुले यांच्या सुटकेसाठी प्राधान्य देत होते. सरकारने दि. १२ रोजी खासगी प्रवासी विमान कंपन्यांना परवानगी दिल्यानंतर कोलते कुटुंबीय तेथून दिल्लीला, नंतर पुण्यात व आज नगरला, शहापूरला पोहोचले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 2:10 am

Web Title: kolte family return in kashmir flood
Next Stories
1 संकल्पित रिपाइं नाशिकमध्ये सहा जागा लढविणार
2 ‘पाणी हक्क आणि समन्यायासाठी संघर्ष उभारू’
3 बीड जिल्ह्य़ात पं.स. सभापती निवडींवर भाजपचा वरचष्मा
Just Now!
X