रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे कॉपीमुक्त ठरले असून राज्यात कोकण बोर्डाच्या अव्वल कामाची चर्चा आहे असे कोकण बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष व विभागीय सचिव आर. व्ही. गिरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दहावीत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून नववीत विद्यार्थ्यांना नापास करण्यात येत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. राज्याचा ८९ टक्के तर कोकण बोर्डाचा ९६.५६ टक्के निकाल जाहीर झाला. सर्वाधिक ९७.४७ टक्के सिंधुदुर्गचा निकाल जाहीर होऊन मुलींची शैक्षणिक भरारी सर्वाधिक आहे. सिंधुदुर्गात मुले ९७.२७ टक्के तर मुली ९७.६८ टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत असे गिरी म्हणाले. सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकण बोर्डात येतात. या दोन्ही जिल्ह्य़ांत कॉपीमुक्त वातावरण होते. शाळांनी शैक्षणिक उपक्रम राबविले. त्यांना पालक, संस्थाचालकांनी साथ दिली त्यामुळेच विद्यार्थी यश मिळवू शकले. तसेच मूल्यमापन योग्य पद्धतीने करण्यात आले. त्यामुळेच दहावी व बारावीत गुणवत्ता विद्यार्थी वाढवू शकले असे गिरी म्हणाले. राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शनदेखील करण्यात आले आहे. शासनाने शारीरिक शिक्षणाचे गुणदेखील दिले असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना २० टक्के गुण शाळांचे दिले जातात, त्यामुळे नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे गिरी यांनी मान्य केले. दहावीत विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागावा म्हणून नववीत विद्यार्थ्यांना नापास करण्यात येत असेल तर ही बाब गंभीर आहे. त्याची चौकशी करू असे गिरी म्हणाले. काही विद्यालये दहावी नापासांचे १७ नंबर फॉर्म भरत असतील तर त्याची पडताळणी केली जाईल असे गिरी म्हणाले. शाळांच्या मुख्याध्यापकांना जून-जुलैमध्ये प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे मूल्यमापनाबाबत त्यांना माहिती दिली जाईल. मात्र विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी सारे प्रयत्न होतील असेही गिरी म्हणाले.