अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणातही सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मोहोराने फुललेल्या आंब्याच्या बागांसाठी हे वातावरण घातक आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये सोमवारपासून ढगाळ वातावरण आहे. रायगड जिल्ह्य़ात तर काही ठिकाणी सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे तुरळक पाऊसही पडला. अन्य दोन जिल्ह्य़ांमध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण आहे. अचानक बदललेल्या या वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात सोमवारी दुपारनंतर सर्वत्र ढगाळ हवामान निर्माण झाले. ते मंगळवारीही कायम होते. जिल्ह्य़ात सध्या सर्वत्र आंब्याच्या झाडांना उत्तम मोहोर असून, अनेक ठिकाणी बारीक कैऱ्याही धरलेल्या आहेत. त्यामुळे यंदाही गेल्या वर्षांप्रमाणे चांगल्या उत्पादनाची आशा आंबा बागायतदार धरुन आहेत. पण, सोमवारपासून निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. असे वातावरण आणखी काही काळ राहिल्यास मोहोर काळा पडून कैऱ्या धरण्याच्या प्रक्रियेवरही विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच प्रतिबंधात्मक औषध फवारण्यांवरील खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.