रत्नागिरी : करोना महामारीच्या अभूतपूर्व उद्रेकामुळे अंतर्गत मूल्यमापनावर भर देत झालेल्या दहावीच्या कोकण विभागीय मंडळाने उत्तीर्णांचे प्रमाण शंभर टक्के राखत यंदाही अव्वल स्थान कायम राखले आहे.

कोकण विभागातून एकूण ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले. यात सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये रत्नागिरीतील १० हजार ७५४ मुले आणि १० हजार ३२३ मुली असे एकूण २१ हजार ८० विद्यार्थी, तर  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ हजार २८४ मुले आणि ४ हजार ८०४ मुली असे एकूण १० हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यंदाचा निकाल माध्यमिक शाळा स्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेला असल्याने तसेच अंतर्गत मूल्यमापनासाटी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र, सराव परीक्षा, अन्य मूल्यमापन इत्यादी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, मुनर्मूल्यांकन या सुविधा या परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसणार आहेत. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहणार आहेत. गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल ९८.७७ टक्के इतका लागला होता. यंदाचा निकाल १०० टक्के लागल्याने निकालात १.२३ टक्के वाढ झाली आहे.

कोकण विभागीय मंडळाने शुक्रवारी दुपारी हा निकाल जाहीर केला. निकाल बघण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची कसरत सुरु होती. वेबसाईट खुली होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. त्यामुळे नाराजीचे सूर उमटत होते.

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी

रत्नागिरी –  नोंदणी ७२६, उत्तीर्ण ६६८, टक्केवारी ९२.१३

सिंधुदुर्ग – नोंदणी २७३, उत्तीर्ण २३३, टक्केवारी ८५.९७

एकूण विद्यार्थी ९९९, उत्तीर्ण ९०१, टक्केवारी ९०.४६