दहावी परीक्षा निकाल खास

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत (दहावी) कोकण विभागाने उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.५६ राखत सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान राखले आहे. विभागाचे प्रभारी अध्यक्ष आर. बी. गिरी आणि सहसचिव चंद्रकांत गावडे यांनी सोमवारी येथे या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर करताना सांगितले की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ४४६ विद्यार्थी (९६.५६ टक्के) या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण किंचित जास्त (०.४४ टक्के)  आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातून परीक्षेला बसलेल्या २७ हजार ५३९ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ४७१ विद्यार्थी (९५.९१ टक्के), तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ६ हजार ८४१ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ३२१ विद्यार्थी (९७.६८ टक्के) या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तसेच एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी २७ हजार १६४ विद्यार्थ्यांनी प्रथम किंवा त्यापेक्षा वरची श्रेणी मिळवली असून १० हजार ९६६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.   या दोन जिल्ह्य़ांमधील मिळून एकूण ६१२ माध्यमिक शाळांचे विद्यार्थी यंदा या परीक्षेला बसले. त्यापैकी २४० शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून ३२१ शाळांचा निकाल ९० ते १०० टक्क्य़ांपर्यंत आहे. उरलेल्या ५१ शाळांचाही निकाल किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे.  राज्यातील अन्य आठ विभागांच्या तुलनेत कोकण विभागाने सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान पटकावले असून या विभागात कॉपीचा एकही प्रकार घडला नाही, असे आवर्जून नमूद करून गिरी म्हणाले की, या दोन जिल्ह्य़ांमधील शाळांनी राबवलेले विविध शैक्षणिक उपक्रम, विशेष अध्यापन वर्ग, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती इत्यादीमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

  • कोकण विभाग अव्वल. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा निकाल सर्वाधिक (९७.४७ टक्के), तर नांदेड जिल्ह्य़ाचा निकाल सर्वात कमी (७४.४८ टक्के)
  • खेळाच्या विशेष गुणांचा लाभ मिळून ३९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
  • नव्वद टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली
  • विशेष श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७३ हजाराने वाढली
  • विशेष गुण आणि ग्रेस गुण घेऊन ९१ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६ टक्क्य़ांनी घसरला
  • निकाल १.९० टक्क्य़ांनी घसरला. ४ हजार २३३ खेळाडूंना विशेष गुणांचा लाभ.
  • एकूण ५३ विषयांपैकी १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात पर्यायी भाषांचा समावेश आहे.

गुणपत्रकांचे वाटप – १५ जून दुपारी ३ वाजता

गुणपडताळणीचा अर्ज करण्यासाठी मुदत – ७ ते १६ जून

उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ७ ते २७ जून

पुनर्मूल्यांकन- पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांमध्ये पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करायचा आहे.

१०० टक्के निकालाच्या शाळा घटल्या

राज्यातील २१ हजार ४३३ शाळांमधील विद्यार्थी या वर्षी राज्य मंडळाच्या परीक्षेला बसले होते. त्यातील राज्यातील ३ हजार ९७४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या या वर्षी घटली आहे. गेल्या वर्षी साडेचार हजार शाळांचा निकाल १०० टक्के होता. १०० टक्के निकाल लागलेल्या सर्वाधिक शाळा मुंबईत आहेत. राज्यातील ५३७ शाळांचा निकाल ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी लागला आहे. त्यापैकी ६१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

७९ हजार विद्यार्थ्यांना एटीकेटी

  • दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा मिळते. हे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पात्र असतात.
  • या वर्षी राज्यातील ७९ हजार ५६० विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील १५ लाख १३ हजार ७०३ विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत.
  • एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४२ हजार ७९५ विद्यार्थी हे एका विषयांत आणि ३६ हजार ७६५ विद्यार्थी हे २ विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा गणित घातविषय ठरला आहे.

chart

कलचाचणी : दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याची

सुरुवात शिक्षण विभागाने या वर्षीपासून केली आहे. या वर्षी १५ लाख ६२ हजार २४८ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली. कलचाचणीचे निष्कर्ष गुणपत्रकाबरोबर १५ जूनला देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती http://www.ivgs.ac.in किंवा www.mahacareermitra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.