पालघरमधील संघर्षानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने सामने येणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून निरंजन डावखरे आणि शिवसेनेकडून ठाण्यातील माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २५ जून रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातूनच विधान परिषदेत निवडून गेले होते. मात्र, राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला.

निरंजन डावखरे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन भाजपाने शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवसेनेने संजय मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या सहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी भाजपच्या संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपाचा हा गड राष्ट्रवादीकडे गेला होता. या पदवीधर मतदारसंघात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. पालघरनंतर हे दोन्ही पक्ष आता या निवडणुकीत आमने सामने आले असून ही निवडणूकही दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे.