जिल्ह्य़ात नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगर पंचायतींच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीत खेड नगर परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर चिपळूण व राजापुरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने बाजी मारली. तर दापोली नगर पंचायतीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक सभापतिपद मिळाले आहे. दरम्यान, मनसेच्या गटनेत्या गौरी शिर्के यांनी ऐन वेळी घूमजाव करत सेनेला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला महिला व बालकल्याण या एकमेव सभापतिपदावर समाधान मानावे लागले.
खेडमध्ये मनसे बिनविरोध
खेड नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पाणी व जलनि:सारण सभापतिपदी, तर आशा सनगर (बांधकाम), तबस्सुम ढेणकर (महिला व बालकल्याण), किशोर चिखले (आरोग्य व स्वच्छता) यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच नगराध्यक्षा ऊर्मिला पाटणे-शेटय़े या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभपती, तर उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर हे समाजकल्याण सभापती म्हणून राहणार आहेत.
चिपळुणात काँग्रेस आघाडी
चिपळूण नपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सर्व सभापतिपदे काबीज करून आपले वर्चस्व कायम राखले आहे. उपनगराध्यक्ष लियाकत शाह (पाणीपुरवठा), कबीर काद्री (नियोजन व विकास), बरकत वांगडे (बांधकाम), निर्मला चिंगळे (शिक्षण), रुखसार अलवी (आरोग्य व स्वच्छता), शिल्पा खापरे (महिला व बालकल्याण) यांची बिनविरोध निवड झाली.
राजापुरातही काँग्रेस आघाडी
राजापूर नपमध्ये काँग्रेस आघाडीने सर्व विषय समित्यांची सभापतिपदे बिनविरोध जिंकून आघाडी अभेद्य असल्याचेच दाखवून दिले. सुलतान ठाकूर (बांधकाम), अ‍ॅड. जमीर खलफे (पाणीपुरवठा), उपनगराध्यक्ष रवींद्र बावधनकर (आरोग्य व स्वच्छता) यांची बिनविरोध निवड झाली, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी एकही नामनिर्देशन न आल्याने या पदांसाठी निवडणूक झाली नाही.
दापोलीत मिलीजुली सत्ता
दापोली नगर पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक सभापतिपद मिळाले आहे. मनसेच्या गौरी शिर्के यांनी ऐन वेळी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने येथे राष्ट्रवादीला एका पदापासून वंचित राहावे लागले. उपनगराध्यक्ष सचिन जाधव (बांधकाम), खालिद रखांगे (पाणीपुरवठा), निकिता परब (आरोग्य व स्वच्छता), विद्या बुरटे (महिला व बालकल्याण), तर उपसभापतिपद विजया शिगवण यांच्याकडे आले आहे.
 मनसेच्या गौरी शिर्के यांनी शिवसेनेला साथ देत गद्दारी केल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष संदीप केळकर यांनी केला आहे. या संदर्भात आपण पक्षाकडे अहवाल पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे सचिन जाधव (बांधकाम) व खालिद रखांगे (पाणी) यांच्यासाठी गौरी शिर्के या अनुमोदक आहेत, तर भाजपच्या निकिता परब (आरोग्य) यांच्यासाठी शिर्के या सूचक आहेत.