स्वत:ला कोकणचे भाग्यविधाते म्हणवणारे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजीनामा नाटय़ाला दोन दिवस उलटले तरी कोकणात त्यावर अजिबात प्रतिक्रिया उमटलेली नाही.  
गेल्या शनिवार-रविवारी राणेंनी रत्नागिरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात जाऊन आठही तालुके पिंजून काढत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दलची नाराजी पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही भरपूर तोंडसुख घेतले. येथे येण्यापूर्वीच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवण्याचे जाहीर केले होते. सोमवारी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. पण त्यानंतर आता ते तडजोडीचे प्रयत्न करू लागल्याचे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी २००५ मध्ये राणे यांनी शिवसेनेचा त्याग केला किंवा २००८ मध्ये काँग्रेसच्या विरोधात बंड केले त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांसह सामान्य जनता मोठय़ा संख्येने त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. राणेंच्या भूमिकेला पाठिंबा देणारे फलकही सर्वत्र लागले होते, पण या वेळी मात्र वातावरण पूर्णपणे बदलल्याचे जाणवत आहे. राणेंचे कट्टर समर्थक आमदार राजन तेली, काका कुडाळकर यांच्यासह अनेक जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून अंतर राखून राहणे पसंत केले आहे. त्यांच्या कोकण दौऱ्यात, तसेच सोमवारी मुंबईत त्यांनी प्रत्यक्ष राजीनामा दिल्यानंतरही हे कार्यकर्ते फिरकले नाहीत. राजापूरचे माजी आमदार गणपत कदम वगळता बहुतेक सर्व प्रमुख कार्यकर्ते राणेंपासून दुरावल्याचे या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे. खुद्द राणे यांना हा बदल जाणवल्यामुळेच त्यांनी आक्रमक शैलीला मुरड घालत तडजोडीचा मार्ग स्वीकारल्याचे मानले जाते.
गेल्या काही वर्षांत कोकणात काँग्रेसचा फारसा प्रभाव राहिलेला नाही. राणेंच्या पक्षप्रवेशानंतर त्यामध्ये संजीवनी फुंकली जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पक्षाला उतरती कळाच लागली आहे. गेले काही दिवस पक्षश्रेष्ठींकडून त्यांना दिली जात असलेली वागणूकही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. पक्षश्रेष्ठी राणे यांना पूर्णपणे नमवण्याच्या मन:स्थितीत असल्याचे त्यातून सूचित होत असल्याचे मत कोकणातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ माजी मंत्र्याने व्यक्त केले. राणे यांचे पाठबळ घटण्यामागे तेही महत्त्वाचे कारण असल्याचे या नेत्याने नमूद केले. अशा परिस्थितीत राणेंची ही राजकीय कोंडी किती काळ चालू राहते आणि या राजकीय नाटय़ाचा काय शेवट होतो, यावर राणेंचे कोकणातील राजकीय स्थान आणि महत्त्व ठरणार आहे.