कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बुधवारी दुपारपासून सुरळीत झाली असली तरी वर्षभरातील या चौथ्या अपघातामुळे या मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची गरज अधोरेखित झाली आहे.
चिपळूण स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने सर्व प्रकारची वाहतूक बुधवारी दुपापर्यंत ठप्प राहिली.
रुळावरील डबे हलवून मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली.
कोकण रेल्वे मार्गावर  पावसाळ्याच्या सुरुवातीला आडवलीजवळ मालगाडीचे डबे घसरले. त्यापाठोपाठ उक्षी येथील बोगद्यात मालगाडीचे पाच डबे घसरून अपघात झाला होता.  गेल्या ऑगस्ट महिन्यात करंजाडी रेल्वे स्थानकाजवळ रुळांना तडे गेल्याने मालगाडीचे डबे घसरून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा झालेला हा चौथा अपघात झाला आहे. मात्र त्यामागील कारण अभियंत्यांच्या पाहणीनंतर स्पष्ट होईल, असे कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  
कोकण रेल्वे मार्गावरील अपघातांची ही गंभीर मालिका पाहता या मार्गाच्या र्सवकष देखभालीची व आवश्यक तेथे दुरुस्तीची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही काळात या मार्गावरून मालगाडय़ांच्या वाहतुकीचे प्रमाण वाढले असून दररोज २४ प्रवासी गाडय़ांव्यतिरिक्त ७ रो-रो व मालगाडय़ा धावत आहेत. त्यामुळे रेल्वेचे रूळ अवाजवी प्रमाणात दबतात व त्यांना तडे जाऊन अपघाताची शक्यता वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत जुने रूळ व अन्य भाग बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.     
मोठा अनर्थ टळला
रत्नागिरीहून सकाळी मुंबईला निघालेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर अपघातस्थळाच्या अलीकडे कामथे रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्यापाठोपाठ आलेल्या मालगाडीला पुढे जाऊ देण्यात आले आणि थोडय़ाच वेळात हा अपघात होऊन मालगाडीचे डबे घसरले. या गाडीऐवजी पॅसेंजर गाडी पुढे गेली असती तर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असता. सुदैवाने तो टळला.
 पण गेल्या २४ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या हद्दीतील रोहे स्थानकाजवळ प्रवासी रेल्वे गाडी रुळावरून घसरल्यामुळे भीषण अपघात होऊन मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यामागेही रुळांना तडे गेल्याचे कारण तज्ज्ञ समितीने दिले होते.
दरम्यान गुरुवारी दिवा-सावंतवाडी आणि सावंतवाडी मडगाव या दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या असल्याचे कोकण रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.