कोकण रेल्वे मार्गावर विलवडे स्थानकाजवळ डोंगरावरून मोठे दगड रुळांवर आल्यामुळे  मंगळवारी सकाळी सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे मार्गावरील सर्व गाडय़ा सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या.
कोकण रेल्वे मार्गावर दगड-माती वाहून येण्यामुळे वाहतूक बंद पडण्याचे प्रकार दरवर्षी पावसाळ्यात घडतात. यंदा असे प्रकार घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने संपूर्ण मार्गावर संभाव्य ठिकाणी उपाययोजना केली होती. तसेच संवेदनशील ठिकाणी चोवीस तास गस्तीपथक तैनात केले आहे. मंगळवारी सकाळी रत्नागिरी-राजापूररोड रेल्वेस्थानकांदरम्यान विलवडे येथे मोठे दगड रेल्वेमार्गावर येऊन पडल्याचे लक्षात आले. त्यामुळे सकाळी सव्वानऊपासून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करून ते बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्यासाठी सुमारे तीन तास लागले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सर्व दगड बाजूला केल्यानंतर धीम्या गतीने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र खोळंब्यामुळे मार्गावरील सर्व गाडय़ा सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या.
हा प्रकार घडला त्या ठिकाणी डोंगराला लोखंडी जाळ्या मारण्यात आल्या होत्या. पण त्या जुन्या झाल्यामुळे दगडांचा भार सहन न होऊन तुटल्या आणि दगड रेल्वेमार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अशा प्रकारे नैसर्गिक दुर्घटनेमुळे वाहतूक बंद पडण्याचा यंदाच्या मोसमातील हा पहिलाच प्रकार आहे.