कोकण रेल्वेचा शुभारंभाचा प्रवासी म्हणून मी साक्षीदार आहे. तसेच पर्यटन संस्थेच्या माध्यमातून जगभर फिरलो, पण कोकण रेल्वे महामंडळाने फायदा होऊनही रेल्वेच्या रॅक बदलण्यासाठी पुढाकार घेतला नाही. जुन्याच डब्यांची गाडी सुरू ठेवल्याची नाराजी द्वारका कृष्ण पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांनी व्यक्त केली. द्वारका कृष्ण पर्यटन सहकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून पर्यटकांना जगभर फिरवितो. त्यामुळे रेल्वेच्या गाडय़ा व पायाभूत सुविधा पाहण्यास मिळतात, असे डी. के. सावंत म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावर धावलेल्या पहिल्या शुभारंभी प्रवासाचा मान पटकाविला आहे. मी तेव्हा प्रवास केला होता. त्यानंतर अनेक पावसाळे गेले, पण कोकण रेल्वे रॅक बदलण्यात पुढाकार घेत नाही, असे डी. के. सावंत यांनी बोलताना सांगितले. दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर रेल्वेला रोहा-नागोठणे येथे अपघात झाला. रेल्वेचे डबे घसरले आहेत. ही रेल्वे जुनी आहे. पॅसेंजर गाडी नव्याने खरेदी केलेली नाही. कोकण रेल्वेच्या गाडय़ा, पायाभूत सुविधा व सुरक्षितता याबाबत कोकण रेल्वे महामंडळ आणि रेल्वे मंत्रालयाने चर्चा करायला हवी, असे डी. के. सावंत म्हणाले. कोकण रेल्वे मार्ग आर्थिकदृष्टय़ा क्षमता वाढविणारा असला तरी प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे सावंत म्हणाले.