कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी संकटप्रवण अशा ७५ ठिकाणी २४ तास पहारा ठेवण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी ज्येष्ठ तंत्रज्ञांसह रत्नागिरी जिल्ह्य़ातील रेल्वे मार्गाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या मार्गावर सुमारे ७५ ठिकाणी अपघातप्रवण असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी २४ तास पहारेकरी नेमण्यात येणार आहेत. तसेच रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ३०० ट्रॅकमन व ७५ रखवालदार नियुक्त करण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या काळात या मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ांचा वेगही ताशी ७५ किलोमीटर ठेवण्यात येणार आहे.
या मार्गावरील रूळ २० वर्षांपूर्वीचे आहेत. अजून ते धोकादायक झालेले नाहीत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे १०० किलोमीटर लांबीचे रूळ नव्याने टाकण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात या मार्गावर झालेल्या काही अपघातांमागे रुळांमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे कारण दिसून आले आहे. त्याबाबत संशोधन चालू असून तज्ज्ञांच्या अहवालानंतर आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असेही तायल यांनी स्पष्ट केले.