यंदाच्या पावसाळ्यातही कोकण रेल्वेचा वेग मंदावणार असून त्याविषयीचे परिपत्रक नुकतेच कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून घोषित करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर कोकण रेल्वेच्या सर्वच गाडय़ांचा वेग मंदावण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे परिमंडळाकडून सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात कोकण भागात मोठय़ा प्रमाणावर पावसाचा जोर असतो. दरम्यान कोकण रेल्वे ज्या भागातून जाते त्या भागातून अनेक मातीचे डोंगर असल्याने मोठय़ा प्रमाणावर रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळण्याच्या घटना सुरू असतात. या दरडी कोसळल्यामुळे अनेकदा रेल्वे गाडय़ा तशाच रेल्वे पटरीवर खोळंबून राहतात. दरड बाजूला काढून रेल्वे मार्ग मोकळा करण्याच्या कामात खूप वेळेची आवश्यकता असते. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात. ही संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पावसाळ्यात कोकण रेल्वेवरील गाडय़ांचा वेग मंदावण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वेच्या विविध भागांत जाणाऱ्या गाडय़ांचा सामान्य वेग हा ताशी ११० किमी इतका आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यावर हाच वेग हा ताशी ७५ किमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरवर्षी कोकण रेल्वेच्या गाडय़ांचा वेग मंदावण्यात येतो. प्रत्येक रेल्वे गाडीचा वेग हा तब्बल ताशी ४० किमीने कमी करण्यात आल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोलाड ते मंगलोर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांची सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. अधिक प्रमाणावर होणाऱ्या पावसामुळे रेल्वे रूळ उखडणे, रेल्वे रुळाखालची माती सरकणे यांसारख्या घटना अनेकदा पावसाळ्यात घडत असतात. या कालावधीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होतात.

रेल्वे गाडय़ांच्या वेग मर्यादेत करण्यात आलेला बदल हा १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी करण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. तसेच रेल्वे अपघातात आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी २४ तास विशिष्ट यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एल के वर्मा यांनी सांगितले.