११५ कि. मी. लांबीचा आणि सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाचा  चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला असून, येत्या रेल्वे अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होईल, असा विश्वास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तायल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. दरम्यान कोकण रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह जयगड-डिंगणी यादरम्यान नवा रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येणार असून, मालवाहतुकीसाठी नवीन लाइन टाकणे, विद्युतीकरण आदी अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. एकूणच कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांसाठी अच्छे दिन येऊ घातले आहेत, अशी प्रतिक्रिया कोकणातून व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे कॉपोरेशनला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत तायल बोलत होते. या वेळी विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम, मुख्य व्यवस्थापक सिद्धेश्वर तेलगू उपस्थित होते. रोहा ते मंगलोर हा कोकण रेल्वेचा मार्ग प्रवासी व मालवाहतुकीसाठी पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा तायल यांनी केला. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्यासाठी १२ हजार कोटींचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असून, येत्या रेल्वे अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून जयगड-डिंगणी या ३४ कि.मी. मार्गासाठी ७५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचा सव्‍‌र्हे झाला असल्यामुळे त्याला मान्यता मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे तायल यांनी सांगितले. या नवीन मार्गामुळे जिंदाल कंपनीची मालवाहतूक कोकण रेल्वेने थेट देश-विदेशात सुरू होईल. त्यामुळे कोकणात बंदर विकासाला चालना मिळण्याबरोबरच रोजगारही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा दुवा ठरणाऱ्या चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालय आणि बोर्डाला सादर करण्यात आला असून, त्याला लवकरच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना या मार्गाची लांबी ११४ कि.मी. एवढी असून, त्यासाठी सुमारे ३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे तायल म्हणाले. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह सर्वच खासदार, आमदार या मार्गासाठी प्रयत्न करीत आहेत. चिपळूण-कराड किंवा वैभववाडी-कराड असा एक मतप्रवाह असून, याबाबतचा अंतिम निर्णय सव्‍‌र्हेनंतर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण रेल्वेमार्गावरील प्रत्येक स्थानकाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखडय़ानुसार प्रत्येक स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने स्थानकाचे सुशोभीकरण, प्रवाशांसाठी सोयी-सुविधा, सरकते जिने, सुलभ शौचालयांसाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर, हरित ऊर्जेवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३०० कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामाला या अर्थसंकल्पानंतर लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. एकूणच हा प्रकल्प कोकणवासीयांसाठी आनंददायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकण रेल्वेमार्गाचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. कोकणचे सुपुत्र व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे कोकण रेल्वेचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी वर्षांला १० कोटी रुपये खर्च करण्याची असलेली मर्यादा आता ४० कोटींपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे तायल यांनी सांगितले.
सतत तोटय़ात असलेली कोकण रेल्वे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून फायद्यात येऊ लागली आहे. त्यातच रेल्वेमंत्रिपदाची सूत्रे प्रभू यांनी स्वीकारल्याने कोकण रेल्वेला आता सुगीचे दिवस सुरू झाले आहेत, असे व्यवस्थापकीय संचालक तायल यांनी शेवटी सांगितले.