गणेशोत्सवावरुन मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांना मंगळवारी मनस्तापाचा सामना करावा लागला. रत्नागिरीवरुन मुंबईसाठी सुटणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये सिंधुदुर्गमधून प्रवासी बसून आल्याने रत्नागिरी स्टेशनवर थांबलेले प्रवासी संतप्त झाले. संतप्त प्रवाशांनी सुमारे साडे तीन तास पॅसेंजर ट्रेन रोखून धरली.

सोमवारी पाच दिवसांच्या गणपतींना निरोप दिल्यानंतर चाकरमानी आता मुंबईत परतू लागले आहेत. सोमवारी रात्रीपासूनच कोकण रेल्वेवरील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. रत्नागिरी येथून मुंबईसाठी सकाळी साडे पाचच्या सुमारास पॅसेंजर ट्रेन सुटते. ही पॅसेंजर ट्रेन मडगावमधून रत्नागिरीला येते. मंगळवारी या ट्रेनमध्ये सिंधुदुर्गतील प्रवासीही बसून आले. रत्नागिरीतून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये आधीच्या स्टेशनवरील प्रवासी बसून आल्याने रत्नागिरीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये बसायला जागाच नव्हती. यामुळे रत्नागिरी स्टेशनवर थांबलेल्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त प्रवाशांनी तब्बल साडे तीन तास रोखून धरली.

रेल्वे प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांनी प्रवाशांना यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, या गोंधळामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली.