मध्य रेल्वेच्या मार्गावरून कोकणात ये-जा करणाऱ्या कोकण रेल्वेच्या वाहतुकीला मध्य रेल्वेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याची तक्रार वेळोवेळी केली जाते. या मार्गावर रविवारच्या अपघाताच्या निमित्ताने प्रवाशांना त्याचा पुन्हा अनुभव आला.
अपघातग्रस्त गाडी कोकण रेल्वेची असली तरी अपघाताचे ठिकाण मध्य रेल्वेच्या हद्दीत येत असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़  मात्र त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कोकण रेल्वेचे अधिकारी आणि वैद्यकीय सेवा घटनास्थळी पोचल्यानंतर मदत व बचाव कार्याला खऱ्या अर्थाने वेग आला, असे या अपघातातून बचावलेल्या काही सुदैवी प्रवाशांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
रायगड जिल्ह्यातील रोहे स्थानकापासून कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. येथून मुंबईतील कुर्ला, दादर किंवा सीएसटी या अंतिम स्थानकांपर्यंतची कोकण रेल्वे गाडय़ांची ये-जा मध्य रेल्वेच्या नियंत्रणाखाली चालते. त्यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा रोहे स्थानक सोडल्यानंतरच्या अनेकदा बाजूला काढण्याचे (सायडिंग) प्रकार घडतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे. त्याचबरोबर ठाणे किंवा दिवा रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेच्या गाडय़ांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तर मध्य रेल्वे प्रशासन दखलही घेत नाही, असे वेळोवेळी अनुभवास आले आहे.
अर्थात केवळ मध्य रेल्वे नव्हे, तर एकूणच रेल्वे प्रशासनाची कोकण रेल्वे महामंडळाबाबत सुरवातीपासूनच अशी सावत्रपणाची भूमिका राहिली आहे. कारण या महामंडळाला असलेली स्वायत्तता केंद्रीय रेल्वे प्रशासनाच्या फारशी कधीच पचनी पडलेली नाही. या महामंडळाचे पहिले व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन वगळता त्यानंतर आलेल्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे कटू अनुभव खासगीत कथन केले आहेत. ही कटुता दूर करून म़ ऱे व कोकण रेल्वे यांच्यात समन्वयाचे वातावरण कोणतेही रेल्वेमंत्री निर्माण करू शकलेले नाहीत.

अपघातानंतरही हद्दीचा वाद
अपघात झाल्यानंतरही कोकण आणि मध्य रेल्वेमध्ये हद्दीचा वाद सुरू होता. नागोठणे स्थानक मध्य रेल्वेच्या हद्दीत येते. मात्र हा मार्ग कोकण रेल्वेमार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर उन्हाळी हंगामात मध्य रेल्वे जादा गाडय़ा चालवते मात्र कोकण रेल्वे स्वत:ची पाठ थोपटून घेत़े  हा वाद किमान अपघाताच्या प्रसंगी तरी बाजूला सारणे अपेक्षित होते. मात्र या वेळीही दुर्दैवाने प्रवाशांना या दोन प्रशासनांमधील वाद पाहायला मिळाला.